नवी दिल्लीभारतीय रेल्वेने आज इतिहास रचला आहे. भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे जी संपूर्ण जगात कुठल्याही देशानं अद्याप सुरू केलेली नाही. भारतीय रेल्वेने जगातील पहिली 'हॉस्पीटल ट्रेन' बनवली आहे.
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असणाऱ्या या ट्रेनचं नाव 'लाइफलाइन एक्स्प्रेस' असं ठेवण्यात आलं आहे. रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या एक्स्प्रेसचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.
'लाइफलाइन एक्स्प्रेस' सध्या आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे. या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि पाच ऑपरेटिंग टेबलसह इतर सर्व सुविधा आहेत.
विशेष म्हणजे, 'लाइफलाइन एक्स्प्रेस'मध्ये रुग्णांचा मोफत उपचार केला जाणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने याआधीच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावलं उचललं आहेत. यात रेल्वे स्थानकांवर ऑटोमॅटीक तिकीट तपासणी यंत्र यासह अनेक सुविधांचा समावेश आहे.
'लाइफलाइन एक्स्प्रेस'मध्ये नेमकं काय?ही ट्रेन एकूण ७ डब्ब्यांची आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चिकित्सकांची टीम तैनात आहे. या विशेष ट्रेनमध्ये आतापर्यंत १ लाख ४६ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये कर्करोग, मोती बिंदू अशा अनेक आजारांवर उपचार केले जातात. सर्वात प्रथम भारतानेच अशाप्रकारच्या हॉस्पीटल ट्रेनची उभारणी केली आहे. त्यानंतर आता इतर देशही अशी ट्रेन सुरू करण्याचा विचार करत आहेत.