नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाची शिफारस रद्दबातल करीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चौघांना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले. बिहारमध्ये १९९२ मध्ये घडलेल्या हत्याकांड प्रकरणात या चौघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा जन्मपेठेत रूपांतरित करून राष्ट्रपती मुखर्जी यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी कृष्णा मोची, नन्हेलाल मोची, वीर कुअर पासवान आणि धमेंद्र सिंह ऊर्फ धारू सिंग या चौघांना नवजीवन दिले.बिहार सरकारच्या शिफारशीनुसार गृहमंत्रालयाने ८ आॅगस्ट २०१६ रोजी या चौघांची दयायाचिका रद्द करण्याची शिफारस केली होती. तथापि, राष्ट्रपतींनी या प्रकरणात विविध तथ्यांचा विचार केला. चौघांनी दयायाचिका उशिरा दाखल करणे आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मत या तथ्यांसह अन्य तथ्यांचा यात समावेश होता.राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने मागच्या वर्षी आपल्या आदेशात म्हटले होते की, आयोगापुढे सादर करण्यात आलेली वस्तुस्थिती आणि साहित्यांच्या विश्लेषणानुसार या चौघांनी ७ जुलै २००४ पूर्वी दयायाचिका दाखल केली होती. त्यांची दयायाचिका बिहार सरकारतर्फे गृह विभागामार्फत राष्ट्रपती सचिवालयाकडे पाठविण्यात आली होती; परंतु ही दयायाचिका गृहमंत्रालय, तसेच राष्ट्रपती सचिवालयाकडे पोहोचली नाही. तब्बल बारा वर्षांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या हस्तक्षेपावर या प्रक्रियेत विचार करण्यात आला.
राष्ट्रपतींकडून चौघांना जीवनदान
By admin | Published: January 23, 2017 1:06 AM