नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सध्या सर्वत्र गाजत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, शिवसेना यांच्यासह संत-महंत वेगवेगळी विधानं करून या विषयाला हवा देत आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही, हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिर उभारणीचा निर्धार केलाय, तर सरकार सावध भूमिका घेताना दिसतं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीनंतर राम मंदिरासंदर्भात काम सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
'यंदा एक दिवा प्रभू रामचंद्राच्या नावाने पेटवा, लवकरच काम सुरू होणार आहे. दिवाळीनंतर राम मंदिराच्या उभारणीचे पाहू' असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. शनिवारी (3 नोव्हेंबर) राजस्थानमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावर्षी अयोध्येमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर आणि अधिक उत्सवात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. दिवाळीची जोरदार तयारी सुरू झाली असून जवळपास तीन लाख दिवे पेटवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी शनिवारी 'मी राम जन्मभूमी आंदोलनात सक्रीय होते. त्याबाबतची सुनावणी अद्यापही सुरू आहे. राम मंदिर बांधलं जावं हे माझं स्वप्न आहे. यासाठी माझ्याकडून जी मदत हवी असेल ते करायला मी तयार आहे' असं म्हटलं आहे. तसेच केंद्रीय मंत्री पीपी चौधरी यांनी राम मंदिराचं प्रकरण न्यायालयात आहे, पण लवकरात लवकर यावर निर्णय यावा अशी आमची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. जर न्यायालयाच्या निकालाला विलंब होत असेल तर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी वैयक्तिक मागणी असल्याचं ते म्हणाले.