नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मधून संवाद साधत देशवासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. वाईट प्रवृत्तींवर मिळवलेला विजय म्हणून दसरा साजरा केला जातो. सत्याचा असत्यावर विजय म्हणून आपण दसरा साजरा करतो, असं मोदी म्हणाले. लवकरच सणासुदीला सुरुवात होईल. कोरोनाचं संकट असल्यानं सण संयमानं साजरे करा आणि वस्तूंची खरेदी करताना देशात तयार झालेल्या उत्पादनांना प्राधान्य द्या. लोकलसाठी व्होकल व्हा, असं आवाहन मोदींनी केलं.सणासुदीआधी, सणासुदीच्या दिवसांत लोक खरेदी करतात. त्यावेळी स्थानिक आणि स्वदेशी वस्तू खरेदी करा, असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी जवानांनाही विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सीमेवर उभ्या असलेल्या जवानांसाठी आपण यंदाच्या दिवाळीत एक दिवा लावू, असं आवाहन त्यांनी केलं. सणासुदीच्या दिवसांत फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करा, असंही मोदींनी सांगितलं.आपण सण साजरे करताना आपले शूर सैनिक देशाच्या सीमेवर तैनात आहेत. भारत मातेच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत. आपण सण साजरे करत असताना त्यांची आठवण जरूर ठेवावी. भारत मातेसाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या जवानांसाठी आपण यंदाच्या दिवाळीत एक दिवा प्रज्वलित करू. मी जवानांना सांगू इच्छितो की तुम्ही भलेही सीमेवर असाल. पण संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. तुम्ही कायम सुरक्षित राहावं, हीच आमची प्रार्थना आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांनी सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी पाठवलं, त्यांना मी नमन करतो, अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.मोदींनी 'मन की बात'मध्ये खादीचा विशेष उल्लेख केला. 'खादी आपल्या साधेपणाची ओळख आहे. आज खादी इको फ्रेंडली रुपातही ओळखली जाते. याशिवाय ती शरीरासाठीही चांगली आहे,' असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सातासमुद्रापार गेलेल्या खादीची गोष्ट सांगितली. 'मेक्सिको देशात ओहाका नावाचं एक शहर आहे. तिथली खादी ओहाका खादी नावानं ओखळली जाते. मार्क ब्राऊन नावाच्या एका तरुणावर गांधींचा इतका प्रभाव पडला की त्यानं मेक्सिकोला जाऊन खादीचं काम सुरू केलं,' असं मोदी म्हणाले.