हैदराबाद : इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने भारतात हातपाय पसरण्यासाठी चालविलेल्या हालचाली आणखी प्रकाशझोतात आल्या आहेत. निष्पाप मुस्लीम तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसकडे आकर्षित करण्याची व त्यांना इसिसमध्ये भरती करून घेण्याचे काम केल्याची कबुली हैदराबादेत अटक झालेल्या अश्फा जबीनने दिली आहे. हा खुलासा होत असतानाच मंगळवारी पहाटे अबुधाबीवरून परतलेल्या चार युवकांना इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून तिरुवअनंतपुरम येथे अटक करण्यात आली. या चौघांची कसून चौकशी सुरू आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केरळात अटक झालेल्या चार युवकांपैकी दोघे करीपूर विमानतळावर उतरले होते अन्य दोघे सकाळी तिरुवअनंतपुरमला पोहोचले होते. दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांमुळेच या तरुणांना हद्दपार करण्यात आले होते असे समजते. इसिसचे जाळे वेगवेगळ््या राज्यांमध्ये कशा पद्धतीने फोफावते आहे, याचा नेमका अंदाज घेण्यात अश्फाची कबुली गुप्तचर यंत्रणांसाठी मोलाची ठरणार आहे. अश्फा जबीन तथा निकी जोसेफने आपल्या कार्यपद्धतीचा व त्यातून इसिससाठी केलेल्या भरतीबाबतचा पाढा पोलिसांपुढे वाचल्याचे कथितरीत्या समजते. सलमान मोईनुद्दीनच्या साथीने इसिससाठी सोशल नेटवर्किंगचा वापर कसा केला, याची साद्यंत कबुली वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या अश्फाने दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. इस्लाम विरुद्ध ख्रिश्चॅनिटी- फ्रेंडली डिस्कशन या नावाने तिने फेसबुकवर ग्रुप केला होता. त्या ग्रुपला फॉलो करणाऱ्यांची संख्या ५० हजारांच्या घरात पोहोचली होती. गेल्या वर्षी इसिसच्या संदर्भातील मजकुराच्या कारणास्तव हे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. पण अश्फाने वेगळ््या नावाने ग्रुप करून हाच उद्योग सुरू ठेवल्याचेही तिच्या अटकेनंतर स्पष्ट झाले आहे. इसिसच्या सीरियातील कारवायांमागील हेतुने ती पुरती भारली गेली आहे. त्यातूनच तिने इसिसकडे भारतातील मुस्लिमांना आकृष्ट करण्याचे काम सुरू केले.
इसिसच्या भारतातील कारवायांवर प्रकाशझोत
By admin | Published: September 16, 2015 1:55 AM