एस. पी. सिन्हा
पटना, दि. 22- बिहारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, वीज पडून आतापर्यंत 57 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. राज्य सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईंकांना 4 लाखांची नुकसानभरपाई दिली आहे.
पावसानं सामान्यांना जरी दिलासा मिळाला असला तरी अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री चंद्रशेखर यांनी आतापर्यंत 56 ते 57 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता चंद्रशेखर यांनी व्यक्त केली आहे. हे मृत्यू 15 वेगवेगळ्या जिल्ह्यात झाले असून, पटना जिल्ह्यात सर्वाधिक 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. रोहतास आणि बक्सरमध्ये पाच लोक वीज पडून मृत्युमुखी पडले आहेत.
नालंदा, औरंगाबाद, पूर्णिया, कैमूर, सहरसा, भोजपूर, कटिहार, किशनगंज, पश्चिम चंपारण, गया आणि समस्तीपूर या जिल्ह्यात वीज कोसळून सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अनेक जखमींची अवस्था बिकट असल्यानं मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन मंत्री चंद्रशेखर यांनी व्यक्त केली आहे. सर्व जखमींवर स्थानिक जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती बिहार सरकारकडून देण्यात आली आहे.