"अयोध्येत आम्ही राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला"; राहुल गांधींचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 08:02 AM2024-07-07T08:02:28+5:302024-07-07T08:02:40+5:30
अयोध्येप्रमाणे गुजरातमध्येही ‘इंडिया’ भाजपला हरवणार
अहमदाबाद : अयाेध्येत भाजपचा पराभव करुन ‘इंडिया’ आघाडीने राम मंदिर आंदाेलनाचा पराभव केला. अयाेध्येत जसा पराभव केला तसाच गुजरातमध्येही पुढील निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करणार असल्याचा दावा काँग्रेस नेते व लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बाेलत हाेते.
राहुल गांधी यांनी गुजरात दाैऱ्यात भाजपवर टीका केली. ते म्हणाले, लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर आंदाेलन सुरू केले हाेते. काॅंग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने राम मंदिर आंदाेलनाचा पराभव केला आहे. अयाेध्येत आंतरराष्ट्रय विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना अजून याेग्य माेबदला मिळालेला नाही. अहमदाबादमध्ये २ जुलै राेजी काँग्रेसच्या कार्यालयाची ताेडफाेड करण्यात आली हाेती.
‘पंतप्रधान अयाेध्येतून लढणार हाेते’
राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान अयाेध्येतून लाेकसभा निवडणूक लढविणार हाेते. मला अयाेध्येच्या खासदाराने सांगितले की, तेथे तीन वेळा सर्वेक्षण करण्यात आले.
मात्र, अयाेध्येतून लढल्यास पराभूत व्हाल, असे त्यांना पाहणी करणाऱ्यांनी सांगितले होते. वाराणसीतूनही १ लाख मतांनीच जिंकून वाचले, असा दावा राहुल यांनी केला.
अटक झालेल्या कार्यकर्त्यांना भेटणार होते पण...
पाेलिसांनी अटक केलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी भेटणार हाेते. त्यांची काेठडी संपणार हाेती. मात्र, पाेलिसांनी कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर करून न्यायालयीन काेठडी मागितली. त्यामुळे राहुल यांची कार्यकर्त्यांशी भेट हाेऊ शकली नाही.
तत्पुर्वी, संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ते अहमदाबादमध्ये दाखल हाेण्यापूर्वी विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पाेलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले.
गेल्या निवडणुकीत केली होती चूक
राहुल गांधी म्हणाले, गेल्यावेळी काॅंग्रेसने निवडणूक व्यवस्थित लढविली नाही. काॅंग्रेसने चूक केली हाेती. केवळ तीन महिनेच काम केले आणि चांगला परिणाम मिळाला. सध्या फक्त ५० टक्के लाेकांनाच वाटते की गुजरातमध्ये काॅंग्रेस जिंकू शकते. ज्यांना वाटत नाही त्यांचे मन वळवा, काॅंग्रेसचा विजय हाेईल, असे राहुल गांधी म्हणाले.
अयाेध्येत नाराजी
मंदिराचे उद्घाटन झाले. लालकृष्ण अडवाणी यांना रथयात्रेत रथावर पाहिले. मात्र, मंदिराच्या उद्घाटन साेहळ्यात श्रीमंत उद्याेगपती दिसले; पण गरीब दिसले नाही. अयाेध्येतील काेणालाही आमंत्रण दिले नसल्याचा राग आला. भाजपमध्ये मंदिराच्या नावाखाली राजकारण केले. परंतु, अयाेध्येतच त्यांचा पराभव झाला.