Lion in Gujarat Village: तुम्ही अनेकदा गावात बिबट्या किंवा वाघ शिरल्याच्या बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण, तुम्ही कधी गावात सिंह शिरल्याची बातमी ऐकली आहे का? गुजरातमध्ये अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली. अमरेली जिल्ह्यातील राजुला तालुक्यातील भेराई गावात ही घटना घडली. हेमंगळवारी मध्यरात्री आठ मादी सिंह गावात शिरले आणि सगळीकडे फेरफटका मारला. यावेळी गावातील कुत्र्यांचा भूंकण्याचा आणि गाईंचा हंबरडा फोडण्याचा आवाज ऐकून गावकरी जागे झाले आणि त्यांना गावात सिंह शिरल्याची माहती मिळाली.
सीसीटीव्हीत सिंहाची हालचाल कैदएका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, हे सिंह गेल्या वर्षभरापासून जवळजवळ दररोज रात्री गावात येतात. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्यावर कुत्रे भुंकायला लागले आणि गायींनीही ओरडून गावकऱ्यांना जागे केले. काही तरुण काय घडत आहे ते पाहण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना गावात आठ सिंह फिरताना दिसले. गावाच्या वेशीजवळील पालडी शेरी येथील सादुल लाला वाघ यांच्या निवासस्थानी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सिंहाचे दृश्य रेकॉर्ड झाले. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.
स्थानिक लोक घराबाहेर पडत नाहीतसिंह शिरल्याचे कळताच गावकऱ्यांनी ताबडतोब वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना कळवले. अधिकाऱ्यांनी तात्काळ गावात धाव घेऊन सिंहांना हुसकावून लावले. एका स्थानिकाने सांगितले की, गावातील सुमारे 50 टक्के लोक शेती करतात. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अनेकदा शेतात जावे लागते, पण या सिंहाच्या भीतीने कुणीच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याचे धाडस करत नाही. विशेष म्हणजे, त्यांना दिवसाही सावध राहावे लागते, कारण अनेकदा सिंह शेतात बसलेले आढळतात.
या परिसरात सिंहाचा मुक्त वावरराजुला रेंजचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर (RFO) योगराजसिंह राठोड म्हणाले की, या भागात सिंहांचा मुक्त वावर आहे. रामपारा गावाजवळ भेराई विडी हे राखीव जंगल आहे. तसेच, जमिनीचा एक मोठा भाग गांडो बावल (प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा) आणि इतर झुडुपांनी व्यापलेला आहे, ज्यामुळे हे सिंहांसाठी एक आदर्श निवासस्थान आहे. विशेष म्हणजे, गुजरातच्या सौराष्ट्र भागातील जुनागढ, गिर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या गीर जंगलात आणि इतर संरक्षित भागात गीर सिंह आढळतात. या भागात फिरणारे सिंह हे आफ्रिकेबाहेरील सिंहांची एकमेव मोठी लोकसंख्या आहे. 2020 मध्ये गीर सिंहांची लोकसंख्या राज्याच्या वनविभागाच्या अंदाजानुसार 674 होती.