अहमदाबाद - सातत्याने घटत असलेल्या वनक्षेत्रांमुळे वन्यजीवांचे मानवी वस्तीमधील आक्रमण वाढत आहे. त्यातून वाघ, बिबटे, सिंह यांसारख्या हिंस्र प्राण्यांचे माणसांवर होणारे हल्लेही वाढले आहेत. दरम्यान, गुजरातमधील अमरेली येथील खांभा परिसरात एका शेतकऱ्याच्या घरामध्ये सिंह घुसल्याचा प्रकार घडला. बराच काळ घरातील खोलीत बसून असलेल्या या सिंहाने मात्र कुणाचेही नुकसान केले नाही. त्याचे झाले असे की, अमरेलीतील खांभा येथे रात्रीच्या वेळी एक सिंह शेतकऱ्याच्या घरात घुसला. दिवाळीचे दिवस असल्याने लोक जागे होते. त्यांनी या सिंहाला घरात जाताना पाहिले. घरात धान्य ठेवलेल्या खोलीच्या दिशेने हा सिंह गेल्यानंतर स्थानिकांनी बाहेरून दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर हा सिंह भुईमुगाच्या गोण्यांवर शांतपणे बसून होता. त्याने कुणालाही नुकसान केले नाही. अखेरीस सिंहाने घरात केलेल्या घुसखोरीची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन सिंहाला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान तासाभराच्या प्रयत्नांनंतर या सिंहाला घराबाहेर काढण्यात यश आले.
शेतकऱ्याच्या घरात घुसला सिंह, पाहून सर्वांची उडाली गाळण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 1:34 PM