लेह (लडाख) - गेल्या दोन, अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावानंतर आता लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून चिनी सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र चिनी घुसखोरीनंतर कळीचा मुद्दा बनलेल्या पँगाँग सरोवर परिसरातून माघार घेण्यास चिनी सैन्य चालढकल करत आहे. दरम्यान, याच पँगाँग सरोवराजवळ असलेल्या स्टकना येथे आज भारतीय लष्कराने जोरदार युद्धसराव केला. या युद्धसरावामध्ये पॅरा कमांडोज सहभागी झाले होते. दरम्यान, युद्धसरावात सहभागी झालेल्या भारतीय जवानांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील या युद्धसरावात सहभागी झाले.
लडाखमधील चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांची वार्ता समोर आल्यानंतर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सर्वप्रथम पँगाँग सरोवर परिसरातच झटापट झाली होती. दरम्यान, आज भारतीय जवानांनी त्याच ठिकाणाजवळ शक्तिप्रदर्शन केले.
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये विवादाला तोंड फुटल्यानंतर आग्रा आणि अन्य ठिकाणांवरून लष्करातील पॅरा कमांडोंना लडाखमध्ये पाठवण्यात आले होते. तसेच निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या पॅरा कमांडोंना सीमावर्ती भागात तैनात करण्यात आले होते. गलवान खोरे, पँगाँग सरोवर आणि दौलत बेग औल्डी या उंचावरील भागात पॅरा कमांडो तैनात झाले होते.
सध्या भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच चिनी सैन्याने अनेक भागातून माघारही घेतली आहे. मात्र चीनचा विश्वासघाती इतिहास पाहता भारत प्रत्येक मोर्चावर सज्ज झालेला आहे. दरम्यान, पॅरा कमांडोंच्या अंगावर शहारे आणणाऱ्या युद्धकालीन कसरती पाहण्यासाठी स्वत: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखचा दौरा केला होता.
दरम्यान, १३ हजार ८०० फूट उंचीवर आज पॅरा कमांडो सराव करत आहेत. तर हवाई दलाची हॅलिकॉप्टर पँगाँग सरोवराजवळ घिरट्या घालत आहेत. लष्कर आणि हवाई दलामध्ये योग्य ताळमेळ राखण्यासाठी हा युद्धसराव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून भारत हा चीनच्या प्रत्येक चालीला उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश या युद्धसरावामधून देण्यात येत आहे.