इंफाळ : जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण, लिओनेल मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो? हा कधी न संपणारा वाद आहे. या दोन्ही खेळाडूंनी जगभरात आपला चाहतावर्ग तयार केला आहे. बॉलिवूड- हॉलिवूड, क्रिकेट आदी विविध क्षेत्रातील सेलेब्रिटीही या खेळाडूंचे फॅन आहेत आणि त्यांनी त्यांचा फेव्हरेट सोशल मीडियावर अनेकदा जाहीरही केला आहे. पण, या चर्चेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी कोणतेही राजकीय उत्तर पुढे न करता राहुल गांधी यांनी त्यांचा फेव्हरेट फुटबॉलपटू जाहीर केला.
लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर राहुल गांधी विविध राज्यात भेटीगाठी घेत आहेत. युवकांशी संवाद साधत आहेत. मणिपूर येथे अशाच एका कार्यक्रमात त्यांना राजकारणापलीकडे प्रश्न विचारण्यात आला. रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांना बार्सिलोना की रेयाल माद्रिद, यापैकी कोणता फुटबॉल क्लब आवडतो, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी क्षणाची दिरंगाई न करता आपण युव्हेन्टस क्लबचे फॅन असल्याचे सांगितले. याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ते म्हणाले," रोनाल्डो असेपर्यंत मी रेयाल माद्रिदचा फॅन होतो. पण आता मी युव्हेन्टसला फॉलो करतो.
रोनाल्डोने गतवर्षी रेयाल माद्रिद क्लबमधून युव्हेन्टस क्लबमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. १०० मिलियन युरोत युव्हेन्टससे रोनाल्डोला करारबद्ध केले. माद्रिदकडून ९ वर्षे खेळताना रोनाल्डोने २ ला लीगा, २ कोपा डेल रे आणि चार चॅम्पियन्स लीग जेतेपद जिंकली. त्यानंतर त्याने युव्हेन्टसकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि जगातील चाहत्यांना झटकाच बसला. या निर्णयानंतर रोनाल्डोची कारकीर्द संपेल असे अनेकांना वाटले, परंतु रोनाल्डोने सर्वांचा चुकीचे ठरवले.