Arvind Kejriwal : दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान एका व्यक्तीने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर द्रव फेकण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या व्यक्तीला त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. भाजपच्या लोकांनी केजरीवालांवर हल्ला केल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरात पदयात्रेदरम्यान ही सगळी घटना घडली. अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने बाटलीतून द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याबाबत दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी भाजपला लक्ष्य केलं. "भाजप नेते सर्व राज्यांमध्ये सभा घेतात, त्यांच्यावर कधीही हल्ला होत नाही. अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. नांगलोई येथे भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला. छतरपूरमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून केंद्र सरकार आणि गृहमंत्री काहीच करत नाही," असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं.
अरविंद केजरीवाल यांनी पंचशील पार्क परिसरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. "पीडित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, कारण या घटनेमागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. संपूर्ण दिल्लीतील व्यापाऱ्यांना खंडणीचे कॉल येत आहेत. दिल्लीत गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. शहरात गोळीबाराच्या घटना घडत आहेत," अशी प्रतिक्रिया यावेळी केजरीवाल यांनी दिली.