पटना : आमचे सरकार सत्तेवर आल्यास बिहारमधून दारूबंदी हटवली जाईल, असे जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी जाहीर केले. बिहारमधील चार विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी ही घोषणा केली. प्रशांत किशोर यांच्या पक्ष जन सुराजने पहिल्यांदाच विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभे केले असून पुढील विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे.
दारूबंदीवरून प्रशांत किशोर यांनी बिहारमधील नितीश कुमार सरकारवर टीका केली. सरकारच्या दारूबंदीच्या अंमलबजावणीवर टीका करताना प्रशांत किशोर म्हणाले की, महात्मा गांधीजींनी कायदा करून दारू बंद करा, असे सांगितले नव्हते. दारूबंदी लागू झाल्यावर त्याचा काही फायदा होत असेल तर ठीक, पण बिहारमध्ये दारूबंदी कुठे आहे? प्रत्येक घरात दारू माफिया आहेत. दारूबंदी हटवली पाहिजे. सरकारी फायली आणि नेत्यांच्या भाषणातच दारूबंदी लागू आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले.
आमचे सरकार आल्यास आम्ही तात्काळ दारूबंदी हटवू, असेही प्रशांत किशोर म्हणाले. तसेच,दारूबंदी उठवण्यास विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत प्रशांत किशोर म्हणाले की, जे दारूबंदी उठवण्यास विरोध करत आहेत, तेच अवैध दारू व्यवसायातून कमाई करत आहेत. नितीश कुमार यांच्याशी संबंधित प्रत्येक अधिकारी दारू व्यवसायाशी संबंधित आहे. तिन्ही पक्षांमध्ये दारूशी संबंधित लोक आहेत. खरंतर हे लोक बिहारच्या जनतेवर अन्याय करत आहेत.
दारूबंदीमुळे २० हजार कोटी रुपयांचे नुकसानतथाकथित दारूबंदीमुळे बिहारमधील जनतेचे दरवर्षी २० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. दारूबंदीच्या नावाखाली राज्यातील गोरगरीब जनतेचा पैसा लुटला जात असून, हा पैसा अधिकारी व दारू माफियांकडे जात असून, प्रत्येक गावात दारूविक्री सुरू आहे, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.
"ठिकठिकाणी दारूची विक्री सुरू"बिहारमध्ये दारूबंदी आहे तर विषारी दारू प्यायल्यामुळे लोकांचा मृत्यू कसा काय होत आहे, असा सवालही प्रशांत किशोर यांनी केला. ज्यावेळी आम्ही बिहारमधील जिल्ह्यांमध्ये फिरलो तेव्हा लोकांनी विषारी दारू प्यायल्याने आपल्या भागातील लोकांचा मृत्यू कसा झाला, हे सांगितले. तसेच, विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची माहितीही लोक पोलिसांना देत नाहीत, कारण त्यांच्यावर कारवाई होईल, अशी भीती लोकांना वाटते. बिहारमध्ये कुठेही दारूबंदी लागू नाही. येथे ठिकठिकाणी दारूची विक्री सुरू आहे, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.