Arvind Kejriwal wife Sunita Kejriwal, Delhi CM, Liquor Scam Case: दारू घोटाळा प्रकरणात सध्या दिल्लीचेमुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल हे तुरूगवासात आहेत. पण याच घोटाळ्याशी संबंध असलेले संजय सिंह मात्र तुरुंगातून बाहेर आले आहेत. तुरूंगाबाहेर येताच त्यांनी टीओआयशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल निर्दोष असल्याचा दावा केला. मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक विधाने केली. तिहार जेलमधून जामिनावर बाहेर असलेले संजय सिंह यांनी भाजपावर सडकून टीका केली. संजय सिंह यांच्या म्हणण्यानुसार, या घोटाळ्याचे काही साक्षीदार भाजपाशी संबंधित असून त्यांच्या साक्षीच्या आधारे केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांचा जामीन मिळत नसल्याने आता ते मुख्यमंत्रीपद सोडणार का, त्यांच्या जागी पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीच्या CM बनणार का, अशा काही प्रश्नांची संजय सिंह यांनी उत्तरे दिली.
सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होणार का?
केजरीवाल यांच्या जागी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल दिसणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, संजय सिंह म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि यापुढेही तेच राहतील. आम्ही एक सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, दिल्लीच्या जनतेला अरविंद केजरीवाल यांनीच दिल्लीचे मुख्यमंत्री राहावे असे वाटते. सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना तुरुंगात संगणक आणि इंटरनेट सुविधा देण्यात आल्या, जेणेकरून ते त्यांचे कार्यालय चालवू शकतील. जोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळत नाही, तोपर्यंत त्यांनाही सरकार चालवण्यासाठी अशाच सुविधा मिळाव्यात. आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही. सारं काही आहे तसंच राहिल.
'आप'चे नेतृत्व बदलणार?
आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात बदल होणार का? यावर प्रतिक्रिया देताना संजय सिंह म्हणाले की, मला आशा आहे की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनाही लवकरच जामीन मिळेल आणि तुरूंगातून बाहेर येतील. सर्वोच्च न्यायालयाने PMLAच्या कलम ५० अंतर्गत नोंदवलेल्या साक्षीदारांचे जबाब तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यातून तथ्य आणि सत्य बाहेर येईलच.
तुरुंगातून सरकार कसे चालवणार?
अरविंद केजरीवाल यांना तुरूंगात संगणक द्यावा जेणेकरून ते काम करू शकतील अशी आपची मागणी आहे. पण दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना म्हणतात की, तुरुंगातून सरकार चालवू देणार नाही. अशा स्थितीत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार का? यावर उत्तर देताना संजय सिंह म्हणाले की, संविधानाचे निर्माते डॉ. आंबेडकर आहेत, नायब राज्यपाल नाहीत. मुख्यमंत्र्यांना तुरुंगातून सरकार चालवण्यापासून संविधान रोखत नाही. त्यामुळे तसे काहीही घडणार नाही.