अलाहाबाद, दि. 10 - अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. रविवारी अलाहाबादमध्ये आखाडा परिषदेची बैठक झाली. या बैठकीनंतर देशातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर करण्यात आली. अलाहाबादमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक झाली. बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणा-या 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर केली.
जीवे मारण्याची धमकी- या बैठकीच्या आधी परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.बैठकीत त्यांनी फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी येत असल्याचं सांगितलं. गेल्या तीन दिवसांपासून धमकी येत असल्याचं ते म्हणाले. धमकी देणा-याने आपण आसाराम बापूचा शिष्य असल्याचं सांगितलं असं ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संत उपाधी देण्याबाबतही निर्णय-यावेळी अखिल भारतीय अखाड़ा परिषदेने 'संत' उपाधी देण्यासाठी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित व्यक्तीची संपूर्ण पडताळणी करुन त्याचं आकलन करून नंतरच संत ही उपाधी बहाल केली जाणार आहे. याद्वारे गुरमीत राम रहीम सारख्या लोकांकडून होत असलेल्यी धर्माच्या नावाखालील फसवणुकीला आळा बसेल. विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन म्हणाले, एक-दोन भोंदू व्यक्तींमुळे सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे संत उपाधी देणयाआधी संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे. सरकारला पाठवणार यादी- या ढोंगी बाबांची यादी सरकारला पाठवणार असल्याची माहिती आहे. जेणेकरून अशा ढोंगी बाबांविरोधात कारवाई केली जावी असा त्या मागचा उद्देश आहे. दरम्यान या बैठकीपूर्वी नरेंद्र गिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. बैठकीपूर्वी एक दिवस फोनवरुन ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणारा व्यक्ती आपण आसाराम बापूचा शिष्य असल्याचं सांगत आहे.
हे आहेत ढोंगी बाब- - आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी
- सुखबिंदर कौर उर्फ राधे मां
-सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता
- गुरमीत राम रहीम सिंह
-ओमबाबा उर्फ विवेकानंद झा
-निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह
- रामपाल
-आचार्य कुशमुनि
-वृहस्पति गिरी
-मलखान सिंह
-इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ति द्विवेदी
-स्वामी असीमानंद
-ओम नमः शिवाय बाबा
-नारायण साईं