नवी दिल्ली- जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. यावेळी दहशतवाद्यांनी बसमधून जाणाऱ्या सुरक्षा जवानांना लक्ष्य केलं आहे. पुलवामातल्या अवंतीपुरातल्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले असून, सीआरपीएफचे 35हून अधिक जवान जखमी आहेत. जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेले हा हल्ला काही पहिला नाही. यापूर्वीही दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं आहे. जाणून घ्या कधी कधी झाले जवानांवर दहशतवादी हल्ले
- सप्टेंबर 2016- उरीच्या तळावर भीषण दहशतवादी हल्ला
2016मध्ये उरीतल्या लष्करी तळावर दहशतवादी भीषण हल्ला केला होता. हा हल्ला जम्मू-काश्मीरमधल्या उरी सेक्टरजवळच्या एलओसीजवळच्या भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 18 जवान शहीद झाले आहेत. जवानांच्या कारवाईत चार दहशतवादी ठार झाले होते. हा भारतीय लष्करावर 20 वर्षांनंतर करण्यात आलेला सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळी हातात शस्त्र नसलेल्या रात्रीच्या वेळी झोपेत असलेल्या जवानांवर हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी भारतानं सर्जिकल स्ट्राइकही केले होते.
- 29 नोव्हेंबर 2016- जम्मू-काश्मीरमधल्या नगरोटामध्ये लष्करी कॅम्पवर हल्ला
29 नोव्हेंबर 2016ला जम्मू-काश्मीरमधल्या नगरोटा इथल्या लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर लष्कराचे 7 जवान शहीद झाले होते. या हल्लात दहशतवादी पोलिसांच्या वेशात आले होते.
- 27 एप्रिल 2017- कुपवाड्यातील पंजगाममध्ये सेनेच्या लष्करी कॅम्पवर हल्ला
27 एप्रिल 2017ला कुपवाड्यातील पंजगाम येथे लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं होतं. तर तीन भारतीय जवान शहीद झाले होते.
- 5 जून 2017 – बांदीपोऱ्यातील संबलमध्ये CRPFच्या कॅम्पवर हल्ला
5 जून 2017 ला बांदीपोऱ्यातील संबळमधील सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात लष्करानं चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
- 26 ऑगस्ट 2017- पुलवामा पोलीस लाइनमध्ये दहशतवादी हल्ला
26 ऑगस्ट 2017ला पुलवाम्यातील पोलीस लाइनमध्येही दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते. तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं होतं. 10-11 फेब्रुवारी 2018लाही सुंजवा इथल्या लष्कराच्या तळावर हल्ला झाला होता, ज्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर 6 जवान शहीद झाले होते.
- 2019मध्ये आतापर्यंत 28 दहशतवादी मारले गेले
2019ला 28 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. तर 2014मध्ये 866 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 2018मध्ये जवळपास 614 दहशतवादी घटना घडल्या. 2018मध्ये 91 सुरक्षा जवान शहीद झाले. 2018मध्ये 257 दहशतवादी मारले गेले. 2017मध्ये 213 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं. तर लष्कराचे 80 जवान शहीद झाले.