नवी दिल्ली - काळानुसार सर्वच जण बदलतात आणि तो बदल गरजेचा देखील असतो. सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. डिजिटल माध्यमांच्या मदतीने अनेक कामं ही अगदी सोपी आणि सहज झाली आहेत. पण तुम्हाला जर कोणी आता भिकारी देखील डिजिटल फ्रेंडली झाल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो, हे खरं आहे. 'पाकिटात सुट्टे पैसे नसतील तर फोन पे करा साहेब' असं म्हणणारा आणि भीक मागताना QR CODE पुढे करणाऱ्या एका भिकाऱ्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
बिहारच्या बेतिया रेल्वे स्टेशनवर गळ्यात ई-वॉलेटचा QR CODE अडकवलेला एक भिकारी आहे. राजू नावाचा हा व्यक्ती लहानपणापासून स्टेशनवर राहतो आणि भीक मागण्याचं काम करते. तो सुरुवातीपासूनच लोकांकडून पैसे मागून आपलं पोट भरायचा. पण अनेकदा लोक म्हणायचे सुट्टे पैसे नाहीत, यासाठी त्याने बँकेत खातं सुरू केलं. आता राजू लोकांकडून सुट्टे पैसे घेत नाही तर फोन पेवर QR CODE स्कॅन करून पैसे पाठवण्यास सांगतो. त्याने देखील आपली पद्धत बदलत डिजिटल जगात स्वत:ला अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. तो आता फोन पे, गुगल पे, पेटीएम सारख्या डिजिटल पद्धतीने भीक मागतो.
'हा' आहे डिजिटल फ्रेंडली भिकारी
मिळालेल्या माहितीनुसार, बेतियाच्या बसवरिया वार्ड नंबर-30 मध्ये राहणारा प्रभुनाथ प्रसाद यांचा 40 वर्षीय एकुलता एक मुलगा राजू प्रसाद गेल्या 30 वर्षांपासून रेल्वे स्टेशनसह अन्य ठिकाणी भीक मागून आपलं पोट भरतो. गती मंद असल्याकारणाने राजू दुसरं काम करू शकत नसल्याचं सांगण्यात आलं. तो लालू यादव यांना बाबा म्हणतो आणि PM मोदींचा भक्त असल्याचं सांगतो. तसेच तो मोदींचा मन की बात कार्यक्रम नेहमीच ऐकतो. QR CODE वरुन भीक मागण्याच्या अनोख्या अंदाजामुळे राजू चर्चेचा विषय झाला आहे. तो स्टेशन आणि बस स्टँडच्या बाहेर येणाऱ्यांकडून मदत मागतो. अनेकदा लोक मदत करण्यास नकार देतात.
सुट्टे नसल्याचं कारण सांगतात. सर्वत्र ऑनलाईन व्यवहार होत असल्याने कॅश बाळगत नाहीत, असं लोक म्हणतात. त्यामुळे राजूने बँकेत खातं उघडलं आणि सोबतच ई-वॉलेटदेखील तयार केला. आता गुगल-पे आणि फोन-पे आदीच्या QR CODE च्या माध्यमातून भीक मागतो. बँक खातं उघडण्यास बराच त्रास सहन करावा लागला होता. जेव्हा मी बँकेशी संपर्क केला तर आधार कार्ड आणि पॅन कार्डाची मागणी केली होती. आधार कार्ड माझ्याकडे आधीपासून होतं, मात्र पॅन कार्ड तयार करावं लागलं. यानंतर गेल्या महिन्यात बेतियाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत खातं उघडलं. बँक खातं उघडल्यानंतर ई-वॉलेटदेखील तयार केलं असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.