ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 18 - रघुराम राजन यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून दुसरा कार्यकाळ भूषवणार नसल्याचं जाहीर करताच भाजपा आणि काँग्रेसमध्ये राजकीय युद्ध सुरु झालं आहे. काँग्रेस नेते पी चिंदबरम यांनी सरकार रघुराम राजन यांच्यासाठी लायक नसल्याची टीका केली आहे. तर अरुण जेटली यांनी रघुराम राजन यांच्या निर्णयाचं स्वागत करत लवकरच त्यांच्या उत्तराधिका-याची घोषणा करण्यात येईल असं सांगितलं आहे.
'रघुराम राजन यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून दुसरा कार्यकाळ भूषवणार नसल्याचं जाहीर केलं आहे हे ऐकून मला दुख: झालं आहे. मी निराश झालो आहे. पण मला याचं आश्चर्य अजिबात वाटत नाही', असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
सरकारने मात्र कोणत्याही प्रकारची टीका किंवा विरोध न करता रघुराम राजन यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 'रघुराम राजन यांनी केलेल्या कामाची आम्ही प्रशंसा करतो. त्यांचा निर्णयाचा आम्हाला आदर आहे', असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बोलले आहेत. तसंच रघुराम राजन यांच्या उत्तराधिका-याची घोषणाही लवकर केलं जाईल अशी माहितीही दिली आहे.
रघुराम राजन यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून दुसरा कार्यकाळ भूषवणार नसल्याचे म्हटले आहे. आरबीआय कर्मचा-यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये त्यांनी पुन्हा गर्व्हनर बनणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. चार सप्टेंबरला कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा शैक्षणिक क्षेत्राकडे वळणार आहेत.
सप्टेंबर २०१३ मध्ये मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा २३ वा गर्व्हनर म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी चलनाची घसरण सुरु होती. महागाई वाढलेली होती आणि विकास खुंटला होता. त्यावेळी मी महागाई कमी करण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी कृती कार्यक्रम ठरवला होता. आपण जे ठरवले होते रिझर्व्ह बँक म्हणून आपण त्यानुसार काम केल्याचा मला अभिमान वाटत आहे असे राजन यांनी पत्रात म्हटले आहे.