कोलकाता: मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सुमारे २०० नागरिकांच्या जमावाने एक रुग्णवाहिका जाळली, त्यात आठ वर्षांचा मुलगा, त्याची आई आणि त्यांच्या एका नातेवाइकाचा कोळसा झाला. रविवारी संध्याकाळी इरोसेम्बा येथे ही घटना घडली; परंतु ती बुधवारी उघडकीस आली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराच्या घटनेत मुलाच्या डोक्यात गोळी लागली होती आणि त्याची आई आणि नातेवाईक त्याला इम्फाळ येथील रुग्णालयात घेऊन जात होते. टोन्सिंग हँगिंग (८), त्याची आई मीना हँगिंग (४५) आणि नातेवाईक लिडिया लोरेम्बम (३७), अशी जमावाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत.
सूत्रांनी सांगितले की, एका आदिवासीचा मुलगा टोन्सिंग आणि त्याची मेईतेई जातीचे आई कांगचुप येथील आसाम रायफल्सच्या मदत शिबिरात राहत होते. ४ जून रोजी संध्याकाळी परिसरात गोळीबार सुरू झाला आणि छावणीत असूनही मुलाला गोळी लागली. गंभीररीत्या जखमी झालेल्या मुलाला रस्त्याने इम्फाळ येथील विभागीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
नेमके काय घडले?
आसाम रायफल्सने काही किलोमीटरपर्यंत रुग्णवाहिका नेली आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांनी जबाबदारी घेतली. संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास सुमारे २०० नागरिकांच्या जमावाने रुग्णवाहिका थांबवली आणि तिला आग लावली.