वाराणसी, दि.23 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला मतदारसंघ वाराणसीच्या दोन दिवसांच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहंशाहपूर येथे शौचालयाची पायाभरणी केली. यावेळी ग्रामस्थांना संबोधित करताना पंतप्रधान असे म्हणाले की,भाजपासाठी व्होटबँकेचे राजकारण आणि निवडणुकीतील विजयापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे.
यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुकही केले. पशुधन आरोग्य मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात दुध विक्रीतून मिळणारा नफा महत्त्वाचा असतो असेही त्यांनी सांगितले. मात्र दुर्दैवाने यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला
व्होट बँकसाठी कामं नाही करत विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी असे म्हणाले की, भाजपासाठी व्होटबँकेच्या राजकारणापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे. पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देतो. आतापर्यंत पशूधनासाठी काम करण्यात आलेले नव्हते. पशुपालन आणि दूध उत्पादनामुळे नवीन आर्थिक क्रांतीचा जन्म होईल. देशात आजही अनेकांकडे हक्काचे घर नाही. अशा लोकांना 2022 पर्यंत हक्काचे घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शिवाय, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
स्वच्छता माझ्यासाठी पूजा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसंदर्भात बोलताना म्हटले की, अस्वच्छता आजार वाढवण्याचं काम करते. आरोग्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. स्वच्छता माझ्यासाठी पूजा आहे. स्वच्छता राखणं संपूर्ण देशाची जबाबादारी आहे. सफाईसाठी जेवढं काम होणं अपेक्षित होतं तेवढं झालेले नाही. घाण आपण करायची आणि साफसफाई कुणी दुस-या व्यक्तीनं करायची, ही मानसिकता चालणार नाही.
शौचालय खरंच 'इज्जत' घर पंतप्रधान मोदींनी यावेळी असेही म्हटले की, शहंशाहपूरमध्ये शोचालयाची पायाभरणी केली तेथे शौचालयावर इज्जतघर असे नाव देण्यात आले आहे. मला ही फार आवडली. ज्यांना आपल्या इज्जतची चिंता आहे ते नक्कीच इज्जतघर बांधतील.
जनतेच्या पैशांचा वापर जनतेसाठीच होणार जनतेच्या पैशांचा वापर जनतेच्या भल्यासाठीच होणार. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात आम्ही काम करत आहोत आणि या कामात चांगल्या गतीनं पुढे जात आहोत. आम्ही प्रामाणिकपणे हे अभियान चालवलं आहे आणि जीएसटीदेखील या अभियानाचा एक भाग आहे.
पशुधन आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पशू आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईकदेखील उपस्थित होते.