नवी दिल्ली - भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घामाच्या सुगंधामुळं कर्नाटकामध्ये कमळ फुलले आहे. कर्नाटकमधील पक्षासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या सर्वांचे हे यश आहे. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकी केले आहे. कर्नाटकातील विजयानंतर भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठक आयोजित करणयात आली होती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकाच्या जनतेचे आभार मानले. विजय पराभव होत असतात, तत्व जपणं महत्वाचे असे म्हणत यावेळी त्यांनी काँग्रेसवर बोचरी टीकाही केली.
कर्नाटकातला भाजपाचा विजय असामान्य आणि अभूतपूर्व आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एकीकडे कर्नाटकच्या विजयाचा आनंद होत असतानाच वाराणसीत झालेल्या पूल अपघाताबद्दलही त्यांनी आपल्या भाषणात दुःख व्यक्त केले. जे लोक या अपघातात मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी अमित शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पक्ष मुख्यालयात स्वागत केले आहे.
भाषणातील ठळक मुद्दे -
- काही लोक उत्तर आणि दक्षिणेत भांडण लावतात, देशाच्या मूल्यांवर हल्ला करतात - नरेंद्र मोदी
- भाजपाला हिंदी भाषिक पक्ष म्हणणाऱ्यांना या विजयाने उत्तर दिलंय - नरेंद्र मोदी
- वाराणसीत उड्डाणपूल कोसळून झालेल्या अपघातात अनेक जणांना प्राण गमवावे लागले. यूपीचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मृतांच्या नातेवाईकांचं माझ्याकडून सांत्वन : नरेंद्र मोदी
- घामाच्या सुगंधामुळं कर्नाटकामध्ये कमळ फुलले - नरेंद्र मोदी
- कर्नाटकाच्या प्रेमामुळं भाषेची अडचण आली नाही - मोदी
- विजय पराभव होत असतात, तत्व जपणं महत्वाचे - नरेंद्र मोदी
- कर्नाटकचा विजय ऐतिहासिक, असामान्य - नरेंद्र मोदी
- विकृत राजकारण्यांना जनतेने धडा शिकवला - नरेंद्र मोदी
- वाराणसी पुल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली
- नवी दिल्ली - कार्यकर्त्यांच्या अथक कष्टांमुळे विजयी : नरेंद्र मोदी