भदोही: उत्तर प्रदेशातल्या भदोहीमधील एका टोलनाक्यावर अतिशय थरारक अपघात घडली आहे. अवघ्या २ ते ३ सेकंदात काय घडू शकतं, याची प्रचिती एका अपघातामधून आली आहे. भदोहीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १९ वर असलेल्या लाला नगर टोलनाक्यावर धडकी भरवणारा अपघात घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रविवारी टोलनाक्यावर नरोत्तम सिंह बसले होते. टोलनाक्यावर असलेल्या केबिनमधून ते समोरून सुरू असलेली वाहतूक पाहत होते. तितक्यात अचानक नरोत्तम सिंह उठले आणि घाईनं केबिनबाहेर पडले. त्यानंतर अवघ्या २ ते ३ सेकंदांत एक भरधाव ट्रक केबिनवर येऊन धडकला. त्यामुळे केबिनचं मोठं नुकसान झालं. प्रसंगावधान दाखवल्यानं नरोत्तम सिंह यांचा जीव वाचला.
टोलनाक्यावर काम करत असलेल्या नरोत्तम सिंह यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण अपघात जवळून पाहिला. नरोत्तम सिंह या अपघातातून वाचतील असं उपस्थितांना वाटलंदेखील नव्हतं. त्यामुळे अपघात झाल्यावर सगळेजण केबिनजवळ धावले. त्यावेळी नरोत्तम त्यांच्यासमोर उभे होते. आमच्या सहकाऱ्याला देवानंच वाचवलं, अशी भावना टोलनाक्याच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ट्रक जप्त केला. ट्रक चालक आणि वाहकालादेखील ताब्यात घेतलं. ट्रकमधून जनावरांची वाहतूक सुरू होती अशी माहिती समोर आली आहे.