नवी दिल्ली : एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर रविवारी संध्याकाळी लाईव्ह शो सुरू असताना धार्मिक चर्चेने थेट हाणामारीचे स्वरूप धारण केले. चर्चेत सहभागी झालेले एक स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू व धर्मगुरू म्हणविणाऱ्या एका महिलेमध्ये ‘फ्री स्टाईल’ झाली. ब्रेकिंग न्यूजमध्ये हा प्रकार दाखविला जात होता. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून टीव्ही वाहिन्यांसह ‘सोशल मीडिया’ही ढवळून निघाला आहे. ‘आयबीएन ७’ या वृत्तवाहिनीवर ‘आज का मुद्दा’ या टीव्ही शोमध्ये मान्यवर चर्चेत मत मांडत असताना हिंदू महासभेचे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू ओम जी आणि महिला ज्योतिषी राखीबाई यांच्यात खडाजंगी झाली. राधे माँ यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप असल्याचा मुद्दा चर्चिला जात असताना तो गुद्यावर गेला. तुम्ही राधे माँवर टीका कशी करता, तुम्ही आधी स्वत:ची चूक सुधारा, असे ओम जी म्हणाले. त्यावर राखीबाई यांनी मी धर्मगुरू म्हणवणाऱ्या दीपा शर्मा यांच्याशी बोलत आहे. तुमच्याशी नाही, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर ओम जी यांनी दीपा शर्मा यांच्यावरही गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख केला. त्यावर शांत वाटत असलेल्या दीपा शर्मा अचानक जागेवरून उठल्या आणि त्यांनी ‘तमीज से बात करीए’ असे म्हणत चक्क ओम जी यांच्या श्रीमुखात लगावली. त्यावर ओम जी यांनी ‘तू क्या मारेगी’ असे म्हणत दीपा शर्मा यांना थप्पड मारत प्रत्युत्तर दिले. दोघांमध्ये झटापटही झाली.
वाहिनीकडून निषेध- 'आयबीएन ७' या वाहिनीने झालेल्या प्रकाराचा निषेध नोंदविला आहे. आम्ही दोन्ही सन्माननीय पाहुण्यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यांच्याकडून जबाबदारीने वागण्याची अपेक्षा होती. असा प्रकार आम्हाला अपेक्षित नव्हता, असेही वृत्तवाहिनीने स्पष्ट केले.
- ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनचे सरचिटणीस एन. के. सिंग यांनीही झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र खेद व्यक्त केला आहे. संबंधित शो मागचा उद्देश दोन्ही बाजूंची मते प्रेक्षकांना कळावी आणि त्याबद्दल त्यांनी सारासार विचार करावा हा होता. हा प्रकार लाजिरवाणा आहे, असेही ते म्हणाले.
(वृत्तसंस्था)