नवी दिल्ली, दि. 11 - पूर्ण ताकतीने दिल्या जाणा-या वंदे मातरम्, वंदे मातरम् हे शब्द ऐकल्यानंतर अंगावर शहारे उभे राहिले. पण मी संपूर्ण हिंदुस्थानला एक प्रश्न विचारतो. आपल्याला वंदे मातरम बोलण्याचा अधिकार आहे का ? मी जे बोलतोय त्यामुळे अनेक लोकांना वेदना होतील याची मला पूर्ण कल्पना आहे. 50 वेळा विचार करा, आपल्या वंदे मातरम् म्हणण्याचा हक्क आहे का ? पान खाऊन पिचकारी मारायची आणि नंतर वंदे मातरम म्हणायचे का ?
आपण सर्व कचरा भारत मातेवर टाकून नंतर वंदे मातरम म्हणणार का ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागोमध्ये केलेल्या प्रसिद्ध भाषणाला आज 125 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने नवी दिल्लीत 'यंग इंडिया, न्यू इंडिया' थीमवर आधारीत विद्यार्थ्यांच्या परिषदेला मोदींनी संबोधित केले. मोदींनी आपल्या भाषणात 'स्वच्छ भारत' मिशनवर भर देताना स्वच्छतेचा विचार मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला.
जे कचरा उचलतात, साफ सफाई करतात त्यांना वंदे मातरम म्हणण्याचा पहिला हक्क आहे असे मोदी म्हणाले. आपल्या भाषणातून स्वामी विवेकानंदांचे विचार मांडताना मोदींनी प्रगतीशील भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या भाषणात मोदींनी मांडलेले काही ठळक मुद्दे...
- स्वामी विवेकानंद यांच्या 'ब्रदर्स अँड सिस्टर्स' या दोन शब्दांतून भारताच्या ताकदीचा परिचय करुन दिला. - स्वामी विवेकानंदांवर कुणाचाही दबाव नव्हता. - स्वामी विवेकानंदांनी 1893 साली 9/11 या दिवशी शिकागोमध्ये केलेले भाषण विश्वविजयाचा दिवस होता.
- आज 9/11 आहे जगामध्ये 2001 नंतर 9/11 बद्दल मोठया प्रमाणावर चर्चा सुरु झाली. पण आम्हाला 1893 सालचे 9/11 आठवते.
- भारतामातेला गलिच्छ करत, आपल्याला वंदे मातरम बोलण्याचा हक्क आहे का ?
- माझे हे बोलणे अनेकांना दुखावणारे आहे याची मला कल्पना आहे.- स्वच्छतेचे काम करणा-यांना पहिला वंदे मातरम बोलण्याचा हक्क आहे.
- तुम्ही महिलांकडे आदराने पाहता का ? - पहिले शौचालय मग देवालय असं मी आधीही बोललो होतो आजही सांगतो.- 'वंदे मातरम् ऐकल्यावर रोमांच उभे राहतात' - रस्त्यावर कचरा टाकून वंदे मातरम म्हणणार का ?
- स्वामी विवेकानंदांमध्ये आत्मसन्मान, आत्मगौरवाचा भाव होता. - भारतातील शेतीला विज्ञानाच्या मदतीने आधुनिक करण्याचा विवेकानंद त्यावेळी विचार करायचे.
- माझ्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. - तरुणाईला कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी कौशल्य विकासाला पहिले प्राधान्य. - नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा तरुणवर्ग तयार झाला पाहिजे.
- अपयशाशिवाय यश मिळत नाही. - यशाचा रस्ता अपयश बनवत, म्हणून अपयशाला घाबरु नका. - किना-यावर उभे राहून लाट बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा.
- तरुणाईने नावीन्याचा शोध घेतला पाहिजे. - कच-यामधून नव निर्मितीचा विद्यार्थ्यांचा प्रकल्प मी पाहिला, हा स्वच्छ भारताचा परिणाम. - भारतात प्रतिभेची कमतरता नाही. - विवेकानंदांची संकल्पना होती वन एशिया. - विश्व संकटात असताना त्याला मार्ग दाखवण्याची क्षमता वन एशियामध्ये आहे.
- पंजाबच्या कॉलेजमध्ये केरल डे होईल का ? तरच एक भारत, श्रेष्ठ भारत शक्य होईल. - कल्पकतेशिवाय आयुष्य नाही, देशाची ताकत, गरज पूर्ण होईल असे काम करुया.