नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचामृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सागर जिल्ह्यातील कडता या गावामध्ये ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे विजेची तार जमिनीवर पडली होती. त्याच दरम्यान तेथे चरण्यासाठी आलेल्या गायींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील म्हटलं आहे.
'सागर जिल्ह्यातील कडता गावामध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू झाला आहे. गायींच्या मालकांना आर्थिक मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल' असं ट्वीट कमलनाथ यांनी केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी (25 ऑगस्ट) गायींचा कळप हा गावाबाहेर असलेल्या परिसरात चरण्यासाठी गेला होता. मुसळधार पावसामुळे विजेचा प्रवाह असलेली एक तार जमिनीवर पडली होती. त्याच दरम्यान विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले.