नवी दिल्ली : मेंदूतील रक्तस्रावामुळे ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाच्या यकृताचे दोन भाग काढून त्याच्या प्रत्येकी एका भागाचे दोन जणांवर यशस्वी प्रत्यारोपण करण्याची दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात पार पडली. तातडीने केलेल्या या शस्त्रक्रियेमुळे या दोघांचे प्राण वाचू शकले.३२ वर्षीय युवकाला यावर्षी मेमध्ये दुबईत मेंदूत रक्तस्राव (हिमोरेज) झाल्यानंतर तेथे शस्त्रक्रिया पार पडल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले तेव्हा न्यूरोसर्जननी त्याला ब्रेन डेड घोषित केले होते, अशी माहिती या रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. शालीन अगरवाल यांनी दिली. सदर युवकाच्या कुटुंबियांनी यकृत दान देण्याला संमती दर्शविल्यानंतर त्याचा एक भाग जालंधरच्या २९ वर्षीय युवकाच्या यकृताला जोडण्यात आला. दिल्लीतील एका ४२ वर्षीय महिलेलाही जवळपास वर्षभरापासून यकृत प्रत्यारोपणाची प्रतीक्षा होती. यकृताचे दोन्ही भाग समान नसतात. सर्जन यकृताचा उजवा निम्मा भाग प्रौढ रुग्णांसाठी तर दुसरा निम्मा भाग छोट्या मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरत असतात. मृत यकृताचा भाग क्वचितच विभागता येतो. डावा भाग लहान असल्यामुळे तो प्रौढासाठी वापरता येत नसतो, अशी माहिती देत डॉ. सुभाष गुप्ता यांनी दोन प्रौढांवरील यकृत प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया कशी अनोखी ठरते ते स्पष्ट केले. डॉक्टरांना यकृत बाहेर काढण्याआधीच ते दोन भागात विभागण्यात यश आले. ३ जून रोजी विशेष शस्त्रक्रियेद्वारे २९ वर्षीय युवकाच्या यकृताला ब्रेनडेड युवकाच्या यकृताचा उजवा भाग जोडण्यात आला. डावा छोटा भाग महिलेच्या यकृताला जोडण्यात आला. डाव्या भागाला जोडणारी वाहिनीही दात्याच्या यकृतातून काढण्यात आली होती. त्यासाठी आम्हाला यकृताची पुनर्रचना करावी लागली, असे डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले. (वृत्तसंस्था)
ब्रेन डेड युवकाच्या यकृताने दोघांना जीवदान
By admin | Published: July 03, 2015 4:09 AM