आजच्या काळात अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. कारण त्यामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळू शकतं. मात्र आपल्या नात्यातील एका व्यक्तीला अवयवदान करणाऱ्या महिलेला काही दिवसांतच मृत्यूने गाठल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तसेच कुटुंबीयांवरी जिवापाड प्रेम करणाऱ्या या महिलेची कहाणी ऐकून सारेच हळहळत आहेत.
ही गोष्ट आहे बंगळुरूमधील अर्चना कामत यांची. त्यांचं वय होतं अवघं ३३ वर्षे. सासरच्या मंडळींशी त्यांचे एवढे चांगले संबंध होते की त्या सासूच्या बहिणीला यकृत दान करण्यास तयार झाल्या. यासाठी कुटुंबीय थोडे घाबरत होते. मात्र अर्चना ह्या या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी ज्या महिलेला यकृत दान केलं होतं. त्यांचं वय होतं ६३ वर्षे. ४ सप्टेंबर रोजी अर्चना यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यामधून यकृत दानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर त्यांना सात दिवस रुग्णालयात थांबावं लागलं. मात्र ज्या दिवशी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, तेव्हापासून त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या शरीरामध्ये संसर्ग वाढला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसेत तो पाहून लोक हळहळत आहेत. मृत अर्चना कामत यांची संपूर्ण गोष्ट या व्हिडीओमधून सांगण्यात आली आहे. त्यांच्या अकाली जाण्यानं एक हसतं खेळतं कुटुंब कोलमडलं आहे. अर्चना यांचा मुलगा हा केवळ ४ वर्षांचा आहे. अर्चना यांनी माणुसकी म्हणून स्वेच्छेने नातेवाईकांची मदत केली होती. मात्र शस्त्रक्रियेदररम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.