पुणे : येमेनच्या लष्करात कर्तव्य बजावत असताना नागरी युद्धादरम्यान मानेला गोळी लागून संपूर्ण शरीर विकलांग झालेल्या जवानाला पुण्यातील डॉक्टरांनी जीवनदान दिले आहे. त्याच्या अस्थिमगजातील (बोन मॅरो) पेशींचे पाठीच्या कण्याच्या (मज्जारज्जू) हानी झालेल्या भागात प्रत्यारोपण करण्यात आले. मागील सहा महिने अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या या जवानामध्ये शस्त्रक्रियेमुळे लक्षणीय सुधारणा झाली आहे.अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अनंत बागूल यांच्या नेतृत्वाखालील चार डॉक्टरांच्या पथकाने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. मन्सूर मोहम्मद हुसैन (वय २२, येमेन) असे या तरुणाचे नाव आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्याच्या मानेत गोळी घुसली होती. त्यावरील उपचारांसाठी त्याला पुण्यात पाठविण्यात आले आहे. दोन शस्त्रक्रियांपैकी पहिल्या शस्त्रक्रियेत त्याच्या काही पेशी अस्थिमगजातून काढल्या आणि त्यात वाढलेल्या घटकांचे पाठीच्या कण्याच्या प्रभावित भागात प्रत्यारोपण केले. गोळी लागल्यामुळे झालेल्या दुखापतीत त्याच्या मज्जारज्जूचा भाग कापला गेला होता. सुमारे ५ लाख पेशींवर काम करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ काही थेंब होते. मज्जारज्जूच्या पुनरुज्जीवनाने आयुष्य वाचविता येते, यावर काही वर्षांपूर्वी विचारच झाला नव्हता, असे डॉ. बागूल यांनी सांगितले. डॉ. आनंद काटकर, डॉ. श्रीनिवास शिंत्रे, डॉ. सचिन कौशिक, डॉ. दीपक पोमन आणि डॉ. मनोज बनसोडे यांनी शस्त्रक्रियेत सहभाग घेतला.
येमेनच्या तरुणाला दुर्मिळ शस्त्रक्रियेने जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:55 PM