तृतीयपंथी म्हणून जगणे हा व्यक्तीचा मूलभूत हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:36 AM2018-06-14T05:36:45+5:302018-06-14T05:36:45+5:30
जन्मजात आपल्या देहाचे जे लिंग आहे त्या लिंगाची व्यक्ती आपण नाही, म्हणजेच आपण चुकीचा देह धारण केलेली तृतीयपंथी व्यक्ती आहोत, असे ज्यांना मनोमन वाटते त्यांना तृतीपंथी अशी उघड लैंगिक ओळख घेऊन त्यानुसार जगण्याचा मूलभूत हक्क आहे, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
आर्नाकुलम - जन्मजात आपल्या देहाचे जे लिंग आहे त्या लिंगाची व्यक्ती आपण नाही, म्हणजेच आपण चुकीचा देह धारण केलेली तृतीयपंथी व्यक्ती आहोत, असे ज्यांना मनोमन वाटते त्यांना तृतीपंथी अशी उघड लैंगिक ओळख घेऊन त्यानुसार जगण्याचा मूलभूत हक्क आहे, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
अशी व्यक्ती सज्ञान असेल तर तिने जन्मजात लिंगाचा स्वीकार करून कुटुंबातच राहावे, अशी सक्ती तिचे पालक तिच्यावर करू शकत नाहीत. स्वत:ला तृतीयपंथी मानणारी व्यक्ती तीच ओळख घेऊन मनाला वाटेल तेथे हिंडू-फिरू शकते किंवा तिची मर्जी असेल तर तृतीयपंथींच्या समाजात सामील होऊन त्यांच्यासोबत राहू शकते, असेही न्यायालयाने अधोरेखित केले.
तृतीयपंथींना स्वतंत्र लैंगिक ओळख बहाल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत केरळ उच्च न्यायालयाने म्हटले की, तृतीयपंथी पुरुष किंवा स्त्री नसली तरी तीही एक व्यक्ती असते व भारतीय राज्यघटनेने दिलेले सर्व मूलभूत अधिकार तिलाही आहेत. जगण्याच्या मूलभूत हक्कात आपले जीवन आपल्याला हवे तसे जगण्याचा अधिकारही अंतर्भूत आहे. व्यक्तीची लैंगिक ओळख हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा असतो. त्यामुळे स्वत:ला जी लैंगिक ओळख मनापासून जाणवते ती वागणे-बोलणे, पोषाख-पेहराव आणि चालीरीतींतून जाहीरपणे अभिव्यक्त करणे, हा अशा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. सरकार किंवा अन्य कोणीही हा हक्क हिरावून घेऊ शकत नाही, अथवा त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. अॅबी जेम्स नावाच्या एका सज्ञान व्यक्तीच्या आईने दाखल केलेली ‘हेबियस कॉर्पस््’ याचिका फेटाळताना न्या. व्ही. चितंबरेश व न्या. के. पी. ज्योतिंद्रनाथ यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. अॅबी जेम्स स्वत:ला तृतीयपंथी मानतो. त्याने ‘अरुंधती’ असे मुलीचे नाव धारण केले असून, घरातून पळून जाऊन तो गेले काही दिवस तृतीयपंथींच्या वस्तीत राहात आहे. त्याला हजर करून कुटुंबाच्या ताब्यात द्यावे, अशी आईची विनंती होती.
आपला मुलगा मनोरुग्ण आहे. त्याला ‘मूड चेंज’चा आजार आहे. त्या भरात तो स्वत:ला मुलगी समजतो, असे आईचे म्हणणे होते. यासाठी पूर्वी त्याच्यावर मानसोपचारही केले होते. आपला मुलगा बाईच्या वेषात तृतीयपंथींसोबत फिरत असल्याचे पाहवत नाही, असे ही आई हात जोडून व डोळ््यात पाणी आणून आर्जव करीत असली तरी आम्ही तिला काहीही मदत करू शकत नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले.
मी जो आहे तो नाही!
अॅबी जेम्स स्त्री वेषात न्यायमूर्तींपुढे हजर झाला. त्याने सांगितले की, मी जन्मापासूनच तृतीयपंथी आहे व आई म्हणते, त्याप्रमाणे हा मला मनोविकार नाही. माझे मन स्त्रीचे आहे; पण शरीराची धाटणी पुरुषी आहे, हे मला बालपणापासूनच जाणवले.
‘चांदूपोट्टु’ हा मल्याळी चित्रपट पाहिल्यावर जगात आपल्यासारख्या बºयाच व्यक्ती आहेत हे मला समजले. लिंगबदल करून घेण्याची माझी इच्छा आहे. मला बाईसारखे जगू दिले नाही तर मी आत्महत्या करेन! न्यायमूर्तींनी त्याची वैद्यकीय/ मानसिक तपासणी करून घेतली.
डॉक्टरांनीही तो तृतीयपंथी
असल्याचा अहवाल दिला. यावरून अॅबी जोन्सची, शेक्सपियरच्या ‘आॅथेल्लो’ नाटकातील लॅगो या खलनायकासारखी ‘मी जो आहे तो नाही’, अशी कुचुंबणा झाली असल्याचा निष्कर्ष न्यायमूर्तींनी काढला.