उत्तराखंडच्या चंदौली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पालीने हजारो घरांची बत्तीगुल केली आहे. पालीमुळे हजारो घरांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याची घटना घडली आहे. चांदसी उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या फिडर क्रमांक 3 आणि 6 चा वीजपुरवठा अचानक बंद झाला. हजारो घरांचा अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कर्मचारी नेमका फॉल्ट काय आहे याचा विचार करत होते. त्यानंतर त्यांनी ट्रान्सफॉर्मरचे पॅनल तपासले.
पॅनलमध्ये एक मेलेली पाल आढळून आली. त्यामुळेच पुरवठा ठप्प झाल्याचे वीज कर्मचाऱ्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी मेलेली पाल बाहेर काढली आणि पॅनल दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चांदसी उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या फिडर क्रमांक 3 व 6 चा वीजपुरवठा अचानक खंडित झाला.
वीजपुरवठा ठप्प झाल्याने वीज कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना नेमका काय बिघाड झाला ते कळू शकलं नाही, मात्र कसून तपासणी केल्यानंतर पॅनलमध्ये मेलेली पाल अडकल्याचं आढळून आला. पालीमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण वीजपुरवठा ठप्प झाल्याचे सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांनी याची माहिती तातडीने विभागीय अधिकाऱ्यांना दिली. ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा बंद करून मेलेली पाल बाहेर काढण्यात आली आणि पॅनल दुरुस्त करण्यात आलं. जवळपास एक तास कर्मचारी दुरुस्तीचं काम करत होते. त्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"