बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे, मध्यान्ह भोजन खाल्ल्याने पुन्हा एकदा अनेक मुलांची प्रकृती बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रसुलपूर टिकुलिया टोला डुमरी येथील विद्यालयात मध्यान्ह भोजनात पाल सापडली आहे. हे जेवल्यानंतर 35 मुलं आजारी पडली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच एसडीओ संजय कुमार यांनी रुग्णालयात आजारी मुलांच्या प्रकृतीचा आढावा घेतला आणि सध्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
सर्व मुलांवर योग्य उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम तयार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाचे पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. मध्यान्ह भोजनात निष्काळजीपणाच्या या प्रकरणाची चौकशी केली जाईल. दरम्यान, शाळेतील विद्यार्थी आकाश कुमारने सांगितले की, आज सकाळी नेहमीप्रमाणे मुलं एमडीएमचे अन्न खात असताना आकाशच्या ताटात एक मेलेली पाल दिसली.
आकाशने याबाबत शिक्षकांना माहिती दिल्यानंतर गोंधळ उडाला. घाईगडबडीत मध्यान्ह भोजनाचे वाटप बंद करण्यात आले. काही वेळाने मुलांची प्रकृती ढासळू लागली आणि 50 मुलांना उलट्या होऊ लागल्या आणि ते आजारी पडले. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पूनम कुमारी यांनी सांगितले की स्वयंसेवी संस्थेद्वारे अन्न वाटप केले जाते. गेल्या काही दिवसांपासून खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड पाहायला मिळत आहे.
पूनम कुमारी यांनी सांगितले की, माहिती मिळताच अन्न वाटप थांबवण्यात आले असून सर्व आजारी मुलांना रुग्णवाहिकेतून सदर रुग्णालयात आणण्यात आले आहे. दुसरीकडे या घटनेनंतर सदर रुग्णालय अलर्टवर असून सिव्हिल सर्जन स्वत: रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. सदर रुग्णालयात 35 मुलांना दाखल केल्याची पुष्टी करताना सिव्हिल सर्जन म्हणाले की, मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. सर्व मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.