Chirag Paswan: २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विरोधकांच्या बंगळुरूतील बैठकीला उत्तर देण्यासाठी NDA नेही मित्र पक्षांची बैठक त्याच दिवशी आयोजित केली होती. यामध्ये ३८ पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीच्या पूर्वसंध्येला लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले. मात्र, एनडीए का सोडली होती आणि पुन्हा सहभागी होण्याचे कारण काय, यासाठी कोण जबाबदार होते, याबाबत चिराग पासवान यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
सन २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान काही मतभेदांमुळे चिराग पासवान यांनी युतीपासून फारकत घेतली. आता ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. एनडीएपासून फारकत घेऊन पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार. २०२० मध्ये आम्ही एनडीएपासून फारकत घेतली. मात्र, तेव्हा आम्हाला भारतीय जनता पक्षाशी कोणतीही अडचण नव्हती. गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कधीही वक्तव्य केलेले नाही. अनेकवेळा माझ्यावरही आरोप झाले की, तुम्ही अचानक भक्त झाले आहात. हनुमान म्हणत टोले लगावले जात होते. भाजपने तुमच्यासाठी काय केले नाही, असे सांगण्यात आले. माझी अडचण फक्त आणि फक्त माझे मुख्यमंत्री नितीश कुमार आहे हे मी अगदी स्पष्टपणे सांगतो, असे चिराग पासवान यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर माझा विश्वास नाही
मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर माझा विश्वास नाही. तुम्हाला आयटी क्षेत्राबद्दल बोलावे लागेल, उद्योगांबद्दल बोलावे लागेल. वेगवेगळ्या शहरांना शैक्षणिक हब कसे बनवता येईल यावर बोलायचे आहे. शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. पूर आणि दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय सांगावे लागतील. मात्र यापैकी मुख्यमंत्री करायला तयार नव्हते. हे त्यांच्या व्हिजन अजेंड्यात कुठेही दिसत नाही. त्यानंतर आमचे एकमत झाले नाही आणि त्याचवेळी मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे चिराग पासवान यांनी सांगितले.
दरम्यान, माझ्या पक्षात किंवा माझ्या कुटुंबातील तुटण्यासाठी मी कोणालाही जबाबदार धरले नाही. माझे कुटुंब तोडण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोठा हात आहे, हे माहिती असतानाही मी त्यांना जबाबदार धरले नाही, कारण माझीच माणसे माझ्यासोबत नाहीत तर मी दुसऱ्यांना कसे सांगणार, अशी खंतही चिराग पासवान यांनी बोलून दाखवली.