पाटणा: बिहारच्या राजकारणात वेगवान आणि नाट्यपूर्ण घडामोडी सुरू आहेत. राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात मोठी फूट पडली आहे. पक्षाचे पाच खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्याला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे पाचही खासदार लवकरच संयुक्त जनता दलात (जेडीयू) प्रवेश करू शकतात.
चिराग पासवान यांच्यापासून अंतर राखून 'स्वतंत्र' होण्याच्या तयारीत असलेल्या ५ खासदारांपैकी दोन तर चिराग यांचेच नातेवाईक आहे. पासुपती पारस पासवान (काका) आणि प्रिन्स राज (चुलत भाऊ) चिराग यांच्यावर गेल्या वर्षीपासून नाराज असल्याचं समजतं. याशिवाय चंदन सिंह, वीणा देवी आणि महबूब अली केशरदेखील पक्षात अस्वस्थ आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीपासून हे पाचही खासदार चिराग यांच्यावर नाराज असल्याचं समजतं.
लोकजनशक्ती पक्षाचे लोकसभेत एकूण ६ खासदार आहेत. चिराग पासवानदेखील लोकसभेवर निवडून गेले आहेत. मात्र इतर पाचही खासदार लोकसभेत आपल्याला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. लोकजननशक्ती पक्षात फूट पडण्याची शक्यता काही महिन्यांपासून वर्तवली जात होती. अखेर पक्षाच्या खासदारांनी मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे चिराग पासवान यांच्यासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे.
भाजपला मोठी मदत करणारा छोटा मित्र संकटातबिहार विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षानं स्वतंत्र निवडणूक लढवली. भाजपप्रणित एनडीएमध्ये असूनही लोक जनशक्ती पक्षानं भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या जेडीयूविरुद्ध उमेदवार उभे केले. मात्र भाजपविरोधात उमेदवार न देता त्यांना अप्रत्यक्षपणे मोठी मदत केली. लोक जनशक्ती पक्षाच्या या रणनीतीमुळे जेडीयूचं मोठं नुकसान झालं. जेडीयूच्या तब्बल २३ जागा कमी झाल्या. तर भाजपच्या २१ जागा वाढल्या. यामुळे बिहारच्या राजकारणात भाजप जेडीयूचा मोठा भाऊ झाला.