ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणजेच भाजपाचे भीष्माचार्य व लोकसभा सदस्य लालकृष्ण अडवाणी यांना लोकमतकडून जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेल्या लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात अडवाणींचा सन्मान केला गेला. भारतातील प्रसारमाध्यमांद्वारे संसद सदस्यांना राजधानीतविशेष पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. लोकमत वृत्तपत्र समूह यापुढे दरवर्षी संसदीय पुरस्कार देणार आहे.
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी 4 अशा 8 आदर्श सदस्यांचा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते लोकमत संसदीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लोकमतच्या या सोहळ्यास उपराष्ट्रपती अन्सारींव्यतिरिक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच.डी. देवेगौडा, अर्थमंत्री अरुण जेटली, माजी नगरविकासमंत्री व उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी व माजी लोकसभाध्यक्ष शिवराज पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अडवाणींव्यतिरिक्त संयुक्त जनता दलाचे नेते व राज्यसभा सदस्य शरद यादव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून एन.के. प्रेमाचंद्रन (लोकसभा सदस्य) व सीताराम येचुरी (राज्यसभा सदस्य) यांना दिला गेला. सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू हा पुरस्कार सुश्मिता देव (लोकसभा) व जया बच्चन (राज्यसभा) यांना देण्यात आला, तर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू या पुरस्काराने मीनाक्षी लेखी (लोकसभा) व रजनी पाटील (राज्यसभा) यांचा गौरव करण्यात आला.
या ज्युरींनी केली निवड-
देशातील मान्यवर नेते, संसदेचे माजी सचिव व पत्रकारांच्या स्वतंत्र ज्युरी मंडळाला पुरस्कारयोग्य संसद सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी लोकमतने सोपवली होती. सुमारे ९ तासांच्या चर्चेनंतर ज्युरींनी ८ संसद सदस्यांची निवड केली. ज्युरी मंडळाचे अध्यक्षपद लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी भूषवले. ज्युरी मंडळामध्ये डॉ. मुरली मनोहर जोशी, मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी, शरद यादव, माजी लोकसभा सचिव सुभाष कश्यप, इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा, इंडिया टुडेचे राजकीय संपादक राजदीप सरदेसाई, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व सदस्य सचिव पत्रकार हरीश गुप्ता यांचा समावेश होता.