नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार सार्वजनिक क्षेत्रातील विमान वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एअर इंडियाच्या विक्रीबाबत मोठी अपडेट दिली आहे. येत्या जून महिन्यापर्यंत एअर इंडियाच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण होईल, असे हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दर इयर २०२० पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते. त्यावेळी एअर इंडियाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुरी म्हणाले की, एअर इंडियाची निर्गुंतवणूक होणे आवश्यक आहे. याआधीच्या यूपीए सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले होते. त्यामुळे आज एअर इंडियावर ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत विविध राज्ये आणि केंद्र सरकारकडे एअर इंडियाचे ४९८.१७ कोटी रुपये देणे आहे, असी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, दिल्ली आणि मुंबई विमानतळामधील सरकारची भागीदारी विकली तरी उत्पन्नात सरकारला वाटा मिळत राहील. जे लोक याबाबत चिंता करत आहेत. त्यांना हे माहिती असले पाहिजे की, दिल्ली आणि मुंबईतील विमानतळ हे ६० वर्षांच्या भाडे करारावर आहेत. हे आणि अन्य सहा विमानतळ भाडेकरार समाप्त झाल्यावर एएआयकडे परत येतील. त्यामुळे विकला गेला, वगैरे जे काही दावे केले जात आहेत. तसे काहीच केले जाणार नाही.