नवी दिल्ली : देशाची खरी ताकद हे देशातील बडे नेते नाहीत, तर सामान्य जनता आहे, जी जीवन जगत असताना काही विशेष कार्य करून दाखवते, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केले आहे. ते 'लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020' या कार्यक्रमात बोलत होते. लोकमतने अशा लोकांचा सन्मान केला. यातून अनेकांचे मनोबल वाढेल. अनेकांना यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी यावेळी बोलताना केला.
समाजात अनेक चुकीची तसेच वाईट कामे होत आहेत. मात्र, काही लोकं अतिशय चांगले काम करत आहे. अशा लोकांना समाजासमोर आणले जाते, तेव्हा एक सकारात्मकता येते. आणि हे काम लोकमत समूह करत आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
एकाच व्यक्तीला अनेक पुरस्कार
देश आणि जागतिक पातळीवर अनेक पुरस्कार प्रदान केले जातात. एकाच व्यक्तीला वेगवेगळे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मात्र, लोकमत समूह समाजासाठी काहीतरी वेगळे करणाऱ्या लोकांना शोधून त्यांना पुरस्कार देतो, ही कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार अरविंद केजरीवाल यांनी काढले.
लोकमत म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे लोकमत
लोकमतचा पुरस्कार मिळाल्यानंतर सामान्यजन लोकप्रिय होतात, त्यांना प्रसिद्धी मिळते. यातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. सकारात्मकता मिळते, असे सांगत लोकमत म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच लोकमत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. माझ्या कुटुंबातील कुणीही राजकारण नव्हते. जनतेचे भले करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यावेळी केजरीवाल यांनी लोकमत समूह आणि दर्डा परिवार यांना शुभेच्छा दिल्या.