चंदिगड: कर्जमाफीमुळे शेतकरी सुस्तावतात, असं विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलं आहे. भाजपाकडे कर्जमाफीची योजना नसल्याचा राजकीय फटका हरियाणात लोकसभा निवडणुकीत बसणार नाही, असा दावा त्यांनी केला. खट्टर यांनी काँग्रेसच्या न्याय योजनेवरदेखील भाष्य केलं. न्याय योजनेसाठी निधीची स्वतंत्र तरतूद असणार नाही. इतर सर्व योजना बंद करुन न्याय योजना लागू करण्यात येईल, असादेखील दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीवर मनोहर लाल खट्टर यांनी विस्तृत भाष्य केलं. 'हरियाणात कर्जमाफी योजना नसल्याचा कोणताही नकारात्मक परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसणार नाही. शेतकरी परिपक्व झाला आहे. कर्जमाफी देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव देण्याचे प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत. पिकाला उत्तम हमीभाव दिला जात आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली. मात्र कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नाही. शेती व्यवसाय अधिकाधिक लाभदायक करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा फायदा याआधी कधीही पाहिलेला नव्हता,' असा दावा खट्टर यांनी केला. एखाद्याला मोफत देण्याची सवय लावली, की मग ती व्यक्ती आळशी होते, अशा शब्दांत त्यांनी कर्ममाफीवर भाष्य केलं. 'हरियाणातल्या शेतकरी समुदायाला त्यांच्या पुढील आर्थिक संकटं संपवायची आहे. एकदा लोकांना फुकटात काही मिळायची सवय लागल्यावर ते सुस्तावतात. ते इथून तिथून कर्ज घेऊ लागतात. ते आर्थिक नियोजन करत नाहीत. या प्रकारची योजना (कर्जमाफी) काही राज्यांमध्ये यशस्वी होऊ शकते. कारण तिथली परिस्थिती तशी आहे. मात्र हरियाणात ही योजना यशस्वी होऊ शकत नाही,' असं खट्टर म्हणाले.
भाजपाचे मुख्यमंत्री म्हणतात, कर्जमाफीनं शेतकरी सुस्तावतात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 9:01 AM