'शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना १0 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 05:48 AM2018-08-26T05:48:45+5:302018-08-26T05:49:30+5:30
केरळ सरकारचा मनोदय; कुटुंबाला १0 हजार रुपये भरपाई
तिरूअनंतपूरम : केरळमधील पावसाचे तडाखे आणि पूर यांमुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक, दुग्ध उत्पादक शेतकरी यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना १0 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी दिली.
याशिवाय निर्वासित शिबिरांतून कुटुंबे आपल्या घरी परततील, तेव्हा त्यांना १0 हजार रुपयांची भरपाई देणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. लोकांच्या घरात पुरामुळे साचलेला चिखल काढण्याचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत १ लाख ३१ हजार ६८३ घरांमधून चिखल काढण्याचे काम सरकारी कर्मचारी व स्वयंसेवक यांनी मिळून केले आहे. याशिवाय पावसामुळे विजेचे पडलेले खांब दुरुस्त करण्यात आले आहेत वा त्या ठिकाणी नवे खांब उभारले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरू होण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. आतापर्यंत २५ लाख ६0 हजार घरे व दुकानांपैकी २३ लाख ३६ हजार ठिकाणी वीजपुरवठा सुरू झाला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता अनेकांना घरी परतायचे आहे. शिबिरांमध्ये १0 लाख ४0 हजार ६६८ लोक होते. पण काही जण घरी परतल्याने आता ही संख्या ८ लाख ६९ हजार ७२४ वर आली आहे.
पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यावर राज्य सरकारचा भर दिसत आहे. मात्र पावसाने व पुराने वाहून गेलेले व खचलेले रस्ते दुरुस्त करण्यास काही काळ लागेल, असे दिसत आहे. राज्याच्या काही भागांत अद्याप किरकोळ पाऊ स सुरू आहे, तर काही भागांत आजही पाणी आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीत अडचणी येत आहेत. मात्र सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत ती कामेही पूर्ण करण्याचे सरकारने ठरविले असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. ज्या भागांत उन्ह आहे, तिथे रस्ते दुरुस्ती सुरू केली आहे, असे तो म्हणाला.
३६ जण अद्याप बेपत्ता
केरळमध्ये ८ आॅगस्टपासून आतापर्यंत पावसाने घेतलेल्या बळींची संख्या २६५ असून, अद्याप ३६ जण बेपत्ता आहेत. तेही पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
यंदा ओणमचा उत्साह नाहीच
केरळमध्ये ओणम हा मोठा उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. केवळ हिंदूच नव्हेत, तर ख्रिश्चन व मुस्लीम घरांमध्येही तो साजरा केला जातो, पण पाऊ स व पुरामुळे प्रचंड मनुष्य व वित्तहानी झालेल्या या राज्यात आज हा सण साजराच केला नाही. मात्र, निर्वासित शिबिरांमध्ये काही गोड प्रकार बनविण्यात आले होते. केरळबाहेर राहणाºया मल्याळी लोकांमध्येही ओणमचा उत्साह आज दिसला नाही. ओणमला पाहुण्यांना घरी जेवायला बोलावले जाते. केळीच्या पानावर जेवण वाढले जाते आणि जेवणात किमान २४ खाद्यप्रकार असतात, पण यंदा ते चित्र दिसले नाही. देशा-परदेशांतील अनेक मल्याळी लोकांनी सण साजरा न करता, ती रक्कम मुख्यमंत्री निधीला दिली वा आपल्या कुटुंबाला ते पैसे पाठविले.