हरीश गुप्ता, नवी दिल्ली प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी राजीनामा देताच या पदासाठी आता लॉबिंग सुरू झाली आहे. कार्यकाळ संपण्याच्या चार महिने अगोदरच सरकार यांनी राजीनामा दिला आहे. जवाहर सरकार यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आला नसला तरी या पदासाठी एव्हाना लॉबिंग सुरू झाले आहे. जवाहर सरकार यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत या पदावरून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. चार महिने अगोदरच राजीनामा का दिला?जवाहर सरकार यांचा अडीच वर्षांपासून तसा विद्यमान सरकारशी संघर्ष सुरूहोता. अर्थात संस्थेच्या स्वायत्ततेच्या संरक्षणासाठी प्रसार भारतीच्या सीईओंचा हा संघर्ष सुरू होता. तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री अंबिका सोनी आणि मनीष तिवारी यांच्याशी जसा जवाहर सरकार यांनी संघर्ष केला तसाच तो विद्यमान सरकारच्या मंत्र्यांसोबतही केला. जवाहर सरकार यांनी स्पष्ट केले होते की, संस्थेच्या स्वायत्ततेबाबत कदापि तडजोड करणार नाही आणि राजकीय हस्तक्षेपाला परवानगीही देणार नाही. प्रसार भारतीला एक यशस्वी संस्था म्हणून पुढे आणण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही ते करीत आलेले आहेत. माहिती आणि प्रसारण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकार्यकारी अध्यक्ष सूर्य प्रकाश यांना नियमित नियुक्ती होईपर्यंत सीईओचा पदभार स्वीकारण्यास सांगितले जाऊ शकते. सरकारच्या निकटवर्तीयांपैकी ते एक समजले जातात, तर माहिती व प्रसारण विभागाचे माजी सचिव सुनील अरोरा यांना सीईओपदासाठी प्रसार भारतीकडून विचारणा होऊ शकते. ते सध्या सल्लागार आहेत, तसेच अनुभवी अधिकारी आहेत. नियमित पदावरही त्यांची नियुक्ती होऊ शकते. उपराष्ट्रपती आणि प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती या महत्त्वाच्या पदासाठी नियुक्ती करते.
प्रसार भारतीच्या सीईओपदासाठी लॉबिंग!
By admin | Published: October 05, 2016 4:19 AM