जयपूर : नुकत्याच जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांत राजस्थानामध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे सत्ता आपलीच, या भ्रमात असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. यात आघाडीवर आहेत ते प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तथा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत.शुक्रवारी एक्झिट पोल जाहीर होताच गेहलोत आणि पायलट हे दोघेही नेते वेगवेगळ्या वेळेत दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा केली. मात्र, निकाल जाहीर झाल्यावर आमदारांच्या पसंतीनुसारच मुख्यमंत्री ठरवणार असल्याचे राहुल गांधी यांनी त्या दोघांनाही सांगितल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.पायलट व गेहलोत राजस्थानात परतल्यावर त्यांनी आपल्या समर्थक उमेदवारांची बैठक घेतली आणि मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याच नावाची शिफारस करण्याची विनंती केली. काही निष्ठावंतांना फितवण्यासाठी सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळातील महत्त्वाचे खाते देण्याचे आमिषही दाखवल्याची चर्चा राजस्थानात आहे.पायलट यांची वर्णी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी लागल्यापासून त्यांनी वसुंधरा राजे यांना घेरण्याचा नेहमीच प्रयत्न केला. शिवाय त्यांच्या नेतृत्त्वात पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता. हाच काँग्रेससाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह तयार झाला होता. तेव्हापासून त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाऊ लागले. शिवाय राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडचे विश्वासू सरदार असल्यामुळे राजस्थान काँग्रेसमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. याचा फायदा घेत त्यांनी तिकीट वाटपात आपल्या समर्थकांची वर्णी लावली. त्यामुळे त्यांना अशोक गेहलोत, सीपी जोशी यांसारख्या काही ज्येष्ठ नेत्यांचा रोषही पत्करावा लागला होता.दुसरीकडे सुमारे तीन दशके राजस्थान काँग्रेसवर एकहाती पकड असलेल्या अशोक गेहलोत यांची खुर्ची पायलट यांच्यामुळे डळमळीत आहे. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच सचिन पायलट यांच्या नेतृत्त्वाला विरोध केला. कित्येक वेळेस जाहीर कार्यक्रमातूनही गेहलोत यांनी आपली ही खंत कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखविली आहे. मात्र, हायकमांडकडून अशी वक्तव्ये टाळण्याचे आदेश मिळाल्यानंतर त्यांनी नरमाई घेतली होती. परंतु पायलट यांच्याविषयीचा त्यांचा रोष काही कमी झाला नव्हता. तिकिट वाटपाच्या वेळेस त्यांचा हा रोष बाहेर आलेला दिसला.पायलट यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आपला पत्ता कापला जाण्याचा अंदाज आल्याने गेहलोत यांनी एका प्रचार सभेत सूचक वक्तव्य करताना म्हटले होते, ‘काँग्रेसच्या संभाव्य मुख्यमंत्र्याबाबत माध्यमांत सध्या दोन नावांचीच चर्चा आहे. पण माझ्या मते सी.पी. जोशी, गिरीजा व्यास, रघू शर्मा, रामेश्वर डुडी आणि लालचंद कटारिया हे देखिल मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम उमेदवार आहेत’. त्यामुळे पायलट यांच्या वाटेत अन्य पाच ज्येष्ठ नेत्यांचा अडसर निर्माण झाला होता. मात्र, पायलट यांनी वेळीच या पाचही नेत्यांशी चर्चा करून आपल्या वाटेतील ‘काटे’ दूर केले होते.कोणाकडे जाणार ‘राणी’चे राज्य?विविध सर्वेक्षणांतून राजस्थानी मतदारांनी अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदासाठी पहिला पसंतीक्रम दर्शविल्याने गेहलोत पुन्हा एकदा शर्यतीत आले आहेत.त्यानंतर वसुंधरा राजे आणि तिसऱ्या स्थानी सचिन पायलट यांना पसंतीक्रम देण्यात आला आहेत. त्यामुळे अशोक गेहलोत यांनी ज्येष्ठ आणि अनुभवी नेता म्हणून आपल्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. मात्र, ११ डिसेंबरला प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतरच मुख्यमंत्री कोण होणार? हे समजेल.राजस्थानच्या भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर वसुंधरा राजे यांनी भाजपाच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पुन्हा आम्हीच सरकार स्थापन करू असे त्यांनी सांगितले.
निकालाआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग; गेहलोत फेव्हरिट, पायलटही दावेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 6:04 AM