जम्मू : जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये गुरुवारी नियंत्रण रेषेवर गोळीबाराच्या घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून सैन्याच्या अधिकाऱ्यांनी त्या दिशेने तातडीने धाव घेतली, परंतू तिथे दोन जवान विव्हळत जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. काही वेळाने या जवानांचा मृत्यू झाला. या रहस्यमयी गोळीबार प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार या घटनेत सैन्याच्या पंजाब युनिट १४ च्या दोन जवानांचा मृत्यू झाला. दोघेही पंजाबचेच होते. सुरुवातीला या घटनेला अपघाती फायरिंग म्हटले जात आहे. संरक्षण दलातील सुत्रांनुसार ही घटना गुरुवारी दुपारी राजौरी सेक्टरच्या हनजनवली भागात झाली आहे.
घटनेत जखमी झालेल्या दोन जवानांचा काही वेळात मृत्यू झाला. सूचना मिळताच पोलिसांची टीमदेखील घटनास्थळी पोहोचली. आकस्मिक गोळीबार झाल्याचे संकेत मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच सैन्याचे जवान आणि अधिकाऱ्यांनी लगेचच तिकडे धाव घेतली. यावेळी सरबजीत सिंग आणि नवराज सिंग हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. दोघांनाही त्या अवस्थेत नजीकच्या सैन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या गोळीबाराच्या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती आलेली नाही. दोन्ही जवानांनी वादातून एकमेकांवर गोळी चालविली असेल असे बोलले जात आहे. त्यांच्या बंदुका जप्त करण्यात आल्या असून तपास केला जात आहे.