राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेतकरी आंदोलनाने उडवली भाजपाची दाणादाण, काँग्रेसचा निर्विवाद विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:19 PM2021-12-22T12:19:51+5:302021-12-22T12:20:21+5:30
Rajasthan Sriganganagar Panchayati Raj Election Result: राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या श्रीगंगानगर जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत BJPचा दारुण पराभव झाला आहे. येथील जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत Congressने मुसंडी मारली आहे.
जयपूर - राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या श्रीगंगानगर जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. येथील जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. भाजपाविरोधात मतदारांमध्ये नाराजी एवढी तीव्र होती की रायसिंहनगर पंचायत समितीमध्ये भाजपाला खातेही उघडत आले नाही.
श्रीगंगानगर जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांचे मंगळवारी लागलेले निकाल पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने लागले. येथील जिल्हा परिषदेच्या ३१ मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २५ ठिकाणी विजय मिळवला. तर पंचायत समित्यांच्या १६९ वॉर्डपैकी ११० वॉर्डमध्ये विजय मिळवला. जिल्ह्यातील ९ पैकी आठ पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने निर्विवाद विजय मिळवला. या निकालांमधून मतदार हा भाजपावर किती नाराज आहे हे दिसून आले. तसेच या निकालांमुळे भाजपा नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.
श्रीगंगानगरमध्ये मतदान झालेल्या नऊपैकी आठ पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व राहिले. त्यामध्ये श्रीगंगानगर, रायसिंहनगर, पदमपूर, सूरतगड, घडसाना, अनूपगड, श्रीविजयनगर आणि श्रीकरणपूर येथे काँग्रेसचा प्रमुख बसेल हे निश्चित झाले आहे. तर सादुलशहर येथेही अपक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे.
पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाला केवळ २८ जागा मिळाल्या. तर उर्वरित १८ जागांवर १८ अपक्ष आणि १२ जागांवर माकपा व एका जागेवर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने विजय मिळवला आहे. रायसिंहनगरमध्ये तर भाजपाचे खातेही उघडले नाही. तर श्रीगंगानगर जिल्हा परिषदेच्या ३१ पैकी केवळ ३ जागांवर भाजपाला विजय मिळाला. तर २ ठिकाणी माकपा आणि एका ठिकाणी अपक्षाने विजय मिळवला.