मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक विद्यार्थिनी चोरी करून पळून जाणाऱ्या बदमाशांना भिडली. खरं तर या धाडसी विद्यार्थीनीने चोरट्याची कॉलर पकडून त्यांना दुचाकीवरून खाली पाडले. मात्र, यानंतर चोरटे कानातले ओढून घेऊन पळून गेले. यादरम्यान वृद्ध महिला आणि तिची नात या दोघींनीही मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र कोणीही पुढे आले नाही. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. घटनेच्या सुमारे सहा तासांनंतर पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना चकमकीत अटक केली. अशातच आता मेरठच्या एसएसपी यांनी काल आज्जीकडून सोन्याची साखळी चोरणाऱ्या बदमाशांशी लढणाऱ्या रियाचा गौरव केला आहे. एसएसपींच्या हस्ते सन्मान मिळाल्यानंतर रियाने आनंद व्यक्त केला. रिया म्हणते की, तिला पोलिसांत जाऊन लोकांची सेवा करायची आहे. ती लोकांना सांगते की, अशी घटना घडल्यास घाबरू नये, तर धैर्याने लढा दिला पाहिजे.
दरम्यान, ही घटना मेरठमधील लालकुर्ती भागातील आहे. शनिवारी सायंकाळी 80 वर्षीय वृद्ध महिला संतोष आपली नात रियासोबत बाजारात जात होती. याच दरम्यान बाईकस्वारांनी आजीबाईंचे सोन्याचे कानातले ओरबाडले नि चोरून पोबारा केला. अशातच रिया हिने चपळाई दाखवत कॉलर पकडून चोरट्याला दुचाकीवरून खाली ओढले. संतोष आणि रिया यांनी आरडाओरडा करत लोकांकडे मदत मागितली, पण कोणीच आले नाही. यानंतर चोरटे दुचाकीवरून पळून गेले.
जेव्हा तरूणी बनते 'सिंघम' दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. यानंतर, खबरदाराच्या माहितीवरून पोलिसांनी सुमारे सहा तासांनंतर रात्री उशिरा दोन्ही चोरट्यांना अटक केली.
पोलिसांनी चोरट्यांना केली अटक या घटनेच्या संदर्भात, मेरठचे एसपी सिटी पीयूष सिंग यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी ५ वाजता लाल कुर्ती पोलीस स्टेशन परिसरातील मैदा परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन बदमाशांनी हे कृत्य केले. याचा व्हिडीओ मिळाला आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत स्टेशन प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"