odisha train accident death | बालासोर : ओडिशातील रेल्वेअपघाताने संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आणलं. या अपघातात २८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे, तर ९०० हून अधिक जखमी आहेत. जखमी रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या जखमींचा जीव वाचवण्यासाठी स्थानिक तरूणांनी जे कार्य केलं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. जखमी प्रवाशांना रक्ताची गरज असल्याने मोठ्या प्रमाणात तरूणाईने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला.
स्थानिक डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ हजारहून अधिक युनिट रक्त जमा झाले आहे. रेल्वे अपघातानंतर सरकारने आवाहन न करता स्वंयस्फूर्तीने लोकांनी रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटल गाठले आहे. बालासोर येथे झालेल्या ट्रेन अपघातात ९०० हून अधिक जखमी आहेत. त्यांच्या उपचारासाठी रक्ताची गरज भासणार आहे. त्यासाठी ओडिशातील जनता बाहेर आली आहे. प्रत्येकाचा जीव वाचवायचा हा निर्धार त्यांनी केला आहे.
"रक्तदानासाठी तरुणाईचा मोठा प्रतिसाद आहे. शेकडो लोकांनी रक्तदान केले. कटक, बालासोर आणि भद्रकमध्ये काल रात्रीपासून ३००० हून अधिक युनिट रक्त जमा झाले. आम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मदत फंडाला देखील हे रक्त पुरवणार आहोत ", अशी माहिती जखमींवर उपचार करत असलेले एससीबी मेडिकल कॉलेज, कटकचे डॉ. जयंत पांडा यांनी दिली.
तरूणाईचा मदतीचा हात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले.