रियासी/जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या पदपथावरील प्रस्तावित रोपवे प्रकल्पाविरोधात सोमवारी दुकानदार आणि मजुरांनी काढलेल्या मोर्चाचे संघर्षात रूपांतर झाले.
कटरा शहर हे बेस कॅम्प आहे. त्रिकुटा टेकडीवर असलेल्या वैष्णोदेवी मंदिराला भेट देण्यापूर्वी भाविक येथे मुक्काम करतात. श्री माता वैष्णोदेवी बोर्डाने ताराकोट मार्ग आणि सांझी छतदरम्यान १२ कि.मी. लांबीच्या मार्गावर २५० कोटींचा 'रोपवे' प्रकल्प राबविण्याची योजना जाहीर केली.
सीआरपीएफ वाहनाच्या काचा आंदोलकांनी फोडल्या
केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) वाहन शहरातून जात असताना आंदोलकांनी त्यावर हल्ला केला. त्यात वाहनाच्या काचा फुटल्या. काही आंदोलकांनी पोलिसांवर विटा फेकल्या. वरिष्ठ पोलिस अधीक्षक परमवीर सिंह म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. आंदोलकांच्या मारहाणीत एक पोलिस जखमी झाला. 'भारतमाता की जय' घोषणा देत शेकडो आंदोलकांनी ठिय्या मांडला.