खेडा: शिक्षणामुळे भवितव्य घडतं असं म्हणतात. मात्र देशाचं भविष्य असलेल्या मुलांना जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील खेडा येथे घडत आहे. पूल कोसळून दोन महिने होऊनही प्रशासनाकडून कोणतीही पावलं उचलली जात नसल्यामुळे शाळेत जाण्यासाठी दररोज विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत जातात आणि शाळेतून घरी परततात. नायका आणि भेराई गावांना जोडणारा पूल कोसळल्यानं विद्यार्थ्यांना दररोज जीवावर उदार होऊन शाळेत जावं लागतं. याबद्दल ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे विनंती- अर्ज केले. मात्र प्रशासनानं त्याकडे लक्ष दिलं नाही. 'हा पूल नसल्यानं आम्हाला 10 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आधी आम्हाला केवळ 1 किलोमीटर प्रवास करावा लागायचा,' अशी व्यथा एका ग्रामस्थानं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मांडली.
Video: ऐसे पढेगा इंडिया? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 11:07 AM