सूरत – देशात कोरोना ग्रस्तांचा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन ३ मध्ये केंद्राने काही शिथिलता आणून दारुची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. त्यावेळी अनेक दारुच्या दुकानाबाहेर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. इतकचं काय तर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्जही केला.
देशात चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. ३१ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन असणार आहे. दारुच्या दुकानाबाहेर लांबच्या लांब रांगा, कडक उन्हातही ग्राहक दारु खरेदी करत होते. पण बुधवारी सूरतमध्ये असं चित्र तंबाखूच्या दुकानासमोर पाहायला मिळालं. येथेसुद्धा लोक भर उन्हात लांब रांगा लावून उभे होते.
दिनेश हा असाच एक ग्राहक आहे. तंबाखूच्या खरेदीसाठी लांब रांगेत उभा असणारा दिनेश म्हणतो, कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाला होता त्यामुळे मला आणि माझ्या वडिलांना कुठेही तंबाखू मिळू शकली नाही. पण आता दुकाने उघडल्यापासून मी जिवंत आहे असं मला वाटत आहे. तंबाखू खरेदी करण्यासाठी मी एक तासासाठी लाइनमध्ये उभा आहे.
ग्राहक दुकानदाराच्या घरापर्यंत पोहचले
सूरतमध्ये निलेशचे तंबाखूचे दुकान आहे. लॉकडाऊनमध्ये तंबाखूच्या विक्रीवर सूट दिल्यानंतर ते म्हणाले, दुकान बंद झाल्यामुळे ग्राहकांना मोठी अडचण होईल असं मला वाटते. मला वारंवार फोन येत असतं म्हणून मी मोबाईलही बंद केला होता. काही लोकांना माझ्या घराचा पत्ता मिळाला तेव्हा ते तंबाखूसाठी माझ्या घरी आले होते असं त्याने सांगितले.
दारुच्या दुकानासमोरही रांगा लागल्या होत्या
देशात दारू विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर काही तासांत लोक दारूच्या दुकानांसमोर उभे राहिले. काहीठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचं फज्जाही उडाला होता. दारु खरेदी करण्यासाठी झुंबड लागली होती. दारुची विक्री सामान्य दिवसांपेक्षा कित्येक पटीने जास्त झाली. परंतु गर्दी टाळण्यासाठी अनेक राज्यांनी होम डिलिव्हरीची सुविधा सुरू केली.