नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण केरळ राज्यामध्ये ३० जानेवारी रोजी आढळून आला. ती व्यक्ती चीनमधील वुहान शहरातून परतली होती. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५००वर पोहोचल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्याआधी २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यानंतर २५ मार्चपासून २१ दिवसांचा लॉकडाऊन झाला. आतापर्यंत या लॉकडाऊनचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत.तीन भागांमध्ये वर्गीकरणपुढे कोरोनाचा संसर्गाचे कमी-जास्त प्रमाण लक्षात घेऊन त्या ठिकाणांचे मोदी सरकारने ग्रीन, रेड व ऑरेंज झोन अशा तीन भागांमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार तिथे काय उपाय योजायचे, याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना दिले.लॉकडाऊनचे स्वरूपलॉकडाऊनच्या काळात लोकांनी शक्यतो घरातच थांबावे, असे आवाहन करण्यात येत होते. २५ मार्चच्या लॉकडाऊननंतर आंतरराष्ट्रीय तसेच आंतरदेशीय विमानसेवा, रेल्वे, सार्वजनिक बस, टॅक्सी, मेट्रो आदी सेवा बंद झाल्या. शाळा, महाविद्यालये बंद केली. अत्यावश्यक सेवांना मात्र वगळले. निर्बंध शिथिल करण्यास ४ मे रोजी प्रारंभ झाला.निर्बंध केले शिथीलकाही निर्बंध २० एप्रिल रोजी शिथिल करण्यात आले. काही व्यवसायांना संमती मिळाली. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने तसेच रस्तेबांधणीसह काही कामे सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. किराणा दुकाने उघडण्याचा आदेश २५ एप्रिल रोजी निघाला.अनलॉकची प्रक्रिया सुरुअनलॉकचा पहिला टप्पा ८ जूनपासून सुरू झाला. त्याआधी २५ मे रोजी केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. देशात लॉकडाऊनचा सहावा टप्पा १ जुलैपासून सुरू झाला आहे. विदेशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत एअर इंडियाची चार्टर्ड विमाने काही देशांतरवाना केली.आर्थिक पॅकेजलॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाले, कित्येक लाख लोकांचा रोजगार गेला. असा फटका बसलेल्या कोट्यवधी लोकांना मदत करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. त्याद्वारे दुर्बल घटकातील लोकांच्या खात्यावर काही रक्कम वळती करण्यात आली. तीन महिन्यांचे अन्नधान्य मोफत तसेच स्वयंपाकाचा गॅस त्यांना देण्यात आला. आरोग्यसेवकांचा वैद्यकीय विमाही सरकारने उतरविला. अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने २७ मार्च रोजी काही योजनाही जाहीर केल्या.
Lockdown: देशात लॉकडाऊनचे ५ टप्पे पूर्ण; तरीही दिवसेंदिवस वाढले कोरोना रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 11:39 PM