देशाच्या राजधानीत लॉकडाऊन परतला आहे. परंतू तो कोरोनाचा नाही तर प्रदूषणाचा आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (CPCB) ने दिल्लीवासियांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर सरकारी आणि खासगी कार्यालयांना गंभीर हवा प्रदूषणाला कमी करण्यासाठी वाहनांचा वापर 30 टक्क्यांनी कमी करावा असे निर्देश दिले आहेत.
शनिवारी सकाळी दिल्लीच्या हवेमध्ये AQI 499 रेकॉर्ड करण्यात आले आहे. जी कालपेक्षाही खराब आहे. दिल्लीने यंदाची सर्वात खराब हवा काल नोंद केली आहे. हवेचा गुणवत्ता सूचकांक सायंकाळी 4 वाजता (AQI) 471 एवढा नोंदविण्यात आला होता. गुरुवारी AQI 411 एवढा होता. सीपीसीबी (CPCB) ने शुक्रवारी एका मिटिंगमध्ये सांगितले की, सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी वाहनाचा वापर कमीत कमी करून घरातून काम करावे, कार पुलिंग, फील़्डवरील कामे कमी करणे आदी पर्याय सुचविले आहेत.
दिल्लीमध्ये जे प्रदूषण होते ते पंजाब, हरियाणासारख्या आजुबाजुच्या राज्यांमध्ये शेतात आग लावल्याने किंवा फटाके फोडल्यामुळे होते असे नेहमी सांगितले जाते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शेतातील खोडे जाळल्यास शेतकऱ्यांना शिक्षा करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील शेतात खोडे जाळण्यासाठी आग लावली जाते. असे असले तरी देखील दिवाळीमध्ये दिल्लीवासियांनी फटाके मोठ्या प्रमाणावर फोडले आहेत. यामुळे दिल्लीवासियांनाच त्यांच्या आरोग्याची काळजी नसल्याचे दिसून आले आहे. दिल्लीच्या काही भागात हवेची गुणवत्ता ही 700 (AQI) एवढी पोहोचली आहे. अनेक भाग हे रेड झोन झाले आहेत.