तेलंगणा: कोरोनाचा फैलाव जगभरात झाला असून, त्याचा भारतालाही मोठा फटका बसला आहे. देशात लॉकडाऊन असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. कोरोनाचा फटका बसल्यानं अनेक जण बेरोजगार झाले आहेत. तसेच अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. आंध्र प्रदेशमधल्या एका शिक्षकालाही कोरोनाच्या संकटापायी नोकरी गमवावी लागली आहे. तो आता रस्त्यावर केळी विकत आहे. ४३ वर्षीय सुब्बैया हे आंध्र प्रदेशातील नेल्लोरनगरचे रहिवासी आहेत.गेल्या १५ वर्षांपासून ते शिक्षकाची नोकरी करत आहेत. परंतु या कोरोनाच्या संकटात त्यांना नोकरी गमवावी लागली. डबल पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री असतानाही या शिक्षकाला केळी विकून उदरनिर्वाह करावा लागतो आहे. मार्चच्या अखेरपर्यंत सुब्बैया शिक्षक म्हणून नोकरी करून १६०८० रुपये कमावत होते. परंतु आता त्यांना एका अडचणीचा सामना करावा लागतो आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी मुलाच्या उपचारासाठी ३ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, ते कर्जसुद्धा फेडावं लागत आहे. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या सुब्बैया यांनी बीएडबरोबरच राजकीय विज्ञान आणि तेलुगूमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. जेव्हा १५ वर्षांपूर्वी त्यांना शिक्षण म्हणून नोकरी मिळाली, तेव्हापासून त्यांनी स्वप्न पाहण्यास सुरुवात केली.लग्न होऊन दोन मुलंसुद्धा झाली. एका मुलाचं वय ६ वर्ष, तर दुसऱ्याचं वय पाच वर्षं आहे. एप्रिल आणि मेच्या पगारासाठी कॉलेज प्रशासनानं सर्वच शिक्षकांना एक टार्गेट दिलं होतं. पुढच्या वर्षांसाठी जास्तीत जास्त मुलांचं ऍडमिशन करून दिलं तरच त्यांना पगार मिळणार, अशी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली होती. सर्वच शिक्षकांना १० नव्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करून देण्यास सांगितलं होतं. पण कोरोनाच्या संकटापायी पालक मुलांचं ऍडमिशन करत नव्हते.अशातच ५० टक्के पगार देऊन सुब्बैया यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. त्यांनी एका मित्राला आपली अडचण सांगितली, तर त्या मित्रानं त्यांना केळी विकण्याचा सल्ला दिला. तुमच्यासाठी केळ्याचा व्यापार ठीक आहे. कारण यात १००० रुपये गुंतवल्यानंतर दररोज २०० रुपयांची कमाई होते. त्यांनी मित्राचा सल्ला गांभीर्यानं घेतला आणि २० मेपासून केळी विकण्यास सुरुवात केली. आता हेच त्यांच्या कमाईचं साधन आहे. तसंही कोणतंही काम छोट नसतंच.
हेही वाचा
CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखी 9 कोरोनाबाधित सापडले; एकूण रुग्णसंख्या 130च्या वर
LACजवळ चीननं वाढवल्या हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या; एअरबेसवर भारताची करडी नजर
लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला
लष्कराला मोठं यश; दोन आठवड्यांत ९ ऑपरेशन्स, २२ दहशतवाद्यांचा खात्मा
पाकच्या सरकारी टीव्ही चॅनेलनं दाखवला पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग, उडाली एकच खळबळ